जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ओसरतेय

पॉझिटिव्हीटी रेट 94 टक्क्यांवर; मृत्यू दरात घट
जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ओसरतेय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या पंधरा दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 12 हजारांवर पोहचली होती.

मात्र यात देखील आता घट होवू लागली असून जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 5 हजार 915 पर्यंत पोहचली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक आहे.

जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांच्या आसपास गेली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिमेमूळे जिल्ह्यात करोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते.

पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांवरुन 304 पर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते.

1 एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 11 हजार 813 या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र शासनाच्या ब्रेक द चेन अतंर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले.

बाधित आढळणार्‍या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणार्‍या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले.

साडेअकरा लाख स्वॅबची तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 50 हजार 783 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. असून त्यापैकी 1 लाख 39 हजार 827 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 10 लाख 7 हजार 925 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोविड सेंटरमध्ये केवळ 212 रुग्ण

जिल्ह्यात सध्या 4 हजार 722 रुग्ण होम क्वारंटाईन असून 212 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 5 हजार 915 सक्रीय रुग्णांपैकी 4 हजार 906 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 9 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com