मॉर्निंग वॉक करणार्‍यांना पोलीस ठाण्याची सवारी

51 जणांना प्रत्येकी 200 रुपये दंड
मॉर्निंग वॉक करणार्‍यांना पोलीस ठाण्याची सवारी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरात जिल्हाधिकारी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. कडक निर्बंध असतांनाही मॉर्निंग वॉक करणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे.

आज सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास काव्य रत्नावली चौकात मॉर्निंग वॉक करणार्‍या अशा एकूण 51 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच पुन्हा विनाकारण न फिरण्याची सक्त ताकीदही देण्यात आली.

यादरम्यान तीन रिक्षांवर तसेच विना मास्क फिरणार्‍या तीन जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. मायादेवी नगर, महाबळ, मानराज पार्क, गिरणा टाकी आदी भागात भाजीविक्रेत्यांनाही नियमांचे पालन करण्याबाबत तंबी देण्यात आली.

कारवाईसाठी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले होते.

जळगाव शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले असून शहरासह जिल्ह्यात संचारबंदी तसेच जमावबंदी आदेशही लागू करण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी सर्व प्रभारी अधिकार्‍यांना शहरात विनाकारण करणार्‍या लोकांवर कारवाईचे निर्देश दिले. आज सोमवारी सकाळी डॉ.मुंढे स्वतः रस्त्यावर उतरले होते तर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे देखील सकाळी शहरात फिरले.

यादरम्यान आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकात मॉर्निेग वॉक करणार्‍यांना थेट पोलीस वाहनात बसविण्यात येवून रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अशाप्रकारे 51 जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

विना पार्टिशन असलेल्या सात रिक्षांवर कारवाई

दरम्यान विना मास्क फिरणार्‍या तीन जणांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे याप्रमाणे दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय विना पार्टिशन असलेल्या सात रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 2800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

शहरातील मायादेवी नगर, महाबळ, मानराज पार्क, गिरणा टाकी या भागात दुकाने थाटलेल्या भाजीविक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी दिसून आली. नियमांचे पालन होत नसल्याने या भाजी विके्रत्यांना तंबी देण्यात आली. यावेळी पोलिसांनी या सर्व विक्रेत्यांना अंतर आखून दिले व त्याच जागी व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. सोबत मास्कचा वापर आवश्यक असल्याबाबत ताकीद दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com