जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक करोना चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक करोना चाचण्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली आहे.

त्यापैकी आतापर्यंत 11 मे रोजीपर्यंत 1 लाख 31 हजार 574 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा 13 टक्क्यांंपर्यत खाली आला असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ट्रीपल टीफ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका,आशावर्कर,आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरित प्राप्त व्हावा, याकरिता जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात येत असून बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती व संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. संशयितांचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खाजगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात.

करोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन 7 हजारापेक्षा अधिक कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन करोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी 7 लाख 7 हजार 92 व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 77 हजार 114 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 3 लाख 1 हजार 196 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 54 हजार 460 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. 1 हजार 772 इतर अहवाल आढळले असून सध्या 1471 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com