जिल्ह्यात 1048 नवे रुग्ण

21 जणांचा मृत्यू ; सर्वाधिक 7 मृत्यू एरंडोल तालुक्यातील
जिल्ह्यात 1048 नवे रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी देखील जिल्हाभरात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 48 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 1 हजार 30 जणांनी देखील कोरोनावर मात करीत ते उपचार घेवून घरी परतले आहे.

जिल्ह्यात आज 23 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 48 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 14 हजार 752 एवढी झाली आहे.

तर दुसरीकडे 1 हजार 30 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 1 हजार 788 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 204, जळगाव ग्रामीण 28, भुसावळ 90, अमळनेर 84, चोपडा 84, पाचोरा 53, भडगाव 28,धरणगाव 34, यावल 37, एरंडोल 20, जामनेर 105, रावेर 97,

पारोळा 46, मुक्ताईनगर 31, चाळीसगाव 50, बोदवड 26 आणि इतर जिल्ह्यातील 31 असे एकूण 1 हजार 48 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक 7 मृत्यू एरंडोल तालुक्यातील

शुक्रवारी सलग दहाव्या दिवशी जिल्ह्यात तब्बल 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू एरंडोल तालुकयातील 7 इतके आहे.

तसेच अमळनेर व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी तीन, पारोळा तालुकयातील दोन तर जळगाव शहर, धरणगाव, भुसावळ, पाचोरा, यावल व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 37 इतकी झाली आहे.

949 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 949 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com