सहा राज्यांतून येणार्‍या प्रवाशांची होणार चाचणी

दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, उत्तराखंडचा समावेश : भुसावळ, पाचोरा,रावेर चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर स्थानकांवर तपासणी
सहा राज्यांतून येणार्‍या प्रवाशांची होणार चाचणी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सध्या संपूर्ण जगात करोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहे.

त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी केरळ, गोवा, दिल्ली, एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या स्थानकावर उतरणार्‍या सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग व रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यासाठी या रेल्वे स्थानकांवर 24 तास स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

जळगाव मनपा क्षेत्रात आरोग्य अधिकारी मनपा यांनी व तालुक्याच्या ठिकाणी संबंधित मुख्याधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेशी समन्वय साधून रेल्वे स्थानकावर 24 तास स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या प्रवाशांना जवळच्या कोविड सेंटरला 14 दिवस अलगीकरण करण्यात यावे व रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर 14 दिवस होम कॉरंटाइनचा शिक्का मारण्यात यावा. यासाठी रेल्वेचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही त्यांनी आदेशात दिल्या आहेत.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, केरळ, गोवा, दिल्ली, राजस्थान, गुजरात व उत्तराखंड या राज्यातून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या स्थानकावर उतरणार्‍या प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने 21 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केला जात नाही.

नियमावलीत नमूद कारणांशिवाय व नियमावलीत नमूद नियमांचे पालन न करता केलेला प्रवास हा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे असून ती 1 मे 2021 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा अथवा एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे.

या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी,पासची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com