जिल्ह्यात 1 हजार 115 नवे बाधित रुग्ण

21 जणांचा मृत्यू; मृत्यूदर आटोक्यात येईना
जिल्ह्यात 1 हजार 115 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात 1 हजार 115 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 1 हजार 103 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मृत्यू होणार्‍यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याचा मृत्यूदर पुन्हा वाढू लागला आहे.

जिल्ह्यात आज 17 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 115 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 8 हजार 218 एवढी झाली आहे तर दुसरीकडे 1 हजार 103 कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 95 हजार 79 इतकी झाली आहे.

यात जळगाव शहर 260, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 213, अमळनेर 17, चोपडा 122, पाचोरा 34, भडगाव 10 धरणगाव 45, यावल 38, एरंडोल 58, जामनेर 65, रावेर 77, पारोळा 31, मुक्ताईनगर 42, चाळीसगाव 46, बोदवड 34 आणि इतर जिल्ह्यातील 8 असे एकूण 1 हजार 115 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍यांची संख्या 1 हजार 900 पार

शनिवारी सलग चौथ्यादिवशी जिल्ह्यात तब्बल 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पाच, बोदवड तालुक्यातील चार, जळगाव शहर, जामनेर तालुक्यातील प्रत्येकी तीन तर अमळनेर, भुसावळ, एरंडोल, जळगाव तालुका, पाचोरा व यावल तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 1 हजार 909 इतकी झाली असल्याने जिल्ह्याच्या मृत्यूच्या आकड्याने 1 हजार 900 चा आकडा पार केला आहे.

982 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 982 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com