जिल्ह्यात 1 हजार 33 नवे बाधित रुग्ण

20 जणांचा मृत्यू - दिवसभरात 1 हजार 103 करोनामुक्त; मृत्यूदर आटोक्यात येईना
जिल्ह्यात 1 हजार 33 नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या वाढली आहे. परंतु मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

यातच आज दिवसभरात करोनाचे 1 हजार 33 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात सलग तिसर्‍या दिवशी 20 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यााचा मृत्यूदर पून्हा वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात आज 16 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 33 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 7 हजार 103 एवढी झाली आहे तर दुसरीकडे 1 हजार 103 कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 93 हजार 976 इतकी झाली आहे. यात जळगाव शहर 212, जळगाव ग्रामीण 58, भुसावळ 130, अमळनेर 105, चोपडा 87, पाचोरा 79, भडगाव 10 धरणगाव 53, यावल 30, एरंडोल 49, जामनेर 19, रावेर 84, पारोळा 27, मुक्ताईनगर 32, चाळीसगाव 37, बोदवड 1 आणि इतर जिल्ह्यातील 20 असे एकूण 1 हजार 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहर व यावल तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यात तब्बल 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहर व यावल तालुक्यातील प्रत्येकी चार, अमळनेर तालुक्यातील तीन, चोपडा, रावेर, जामनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर भुसावळ, एरंडोल व भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 1 हजार 888 इतकी झाली असल्याने जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच आहे.

1 हजार 406 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1 हजार 406 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com