करोनाने पाच दिवसाच्या नवजात बालकालाही हिरावले

बालरोग विभागातील अदिक्षता विभागात सुरु होते उपचार
करोनाने पाच दिवसाच्या नवजात बालकालाही हिरावले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पाच दिवसांपूर्वी जन्मास आलेल्या शिशूला कोरोनाची लागण झाली. त्या शिशूवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवल्याची घटना आज उघडकीस आली. नवजात बालकाचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

यावल तालुक्यातील महिलेची 11 एप्रिल रोजी प्रसुती झाली. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला परंतु त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या बाळाला देखील करोनाची लागण झाली.

त्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच खबरदारी म्हणून त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्या बाळांतीण महिलेसह बाळावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

जन्मास आलेले शिशू हे कमी दिवसाचे असल्याने त्याचे वजन कमी होते त्या बाळावर रुग्णालयातील बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना आज त्याची प्राणज्योत मालवली.

पाच दिवसांपासून सुरु आहेत उपचार

पाच दिवसांच्या शिशूवर उपचार सुरु असतांनाच त्याच्या आईवर देखील याच रुग्णालयात व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

सहा शिशू झाले करोनामुक्त

जिल्हा रुग्णालयात अनेक पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली आहे. यातील अनेक बाळांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहे. मात्र आतापर्यंत दहा शिशूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच शिशूंची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्यावर योग्य उपचार करत त्यांना कोरोनामुक्त करीत जीवदान दिले आहे. सद्याच्यास्थितीत उपचार सुरु आहे.

जिल्ह्यातील ही दुसरी घटना

जिल्ह्यात आतापर्यंत दोन बालकांचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अमळनेर तालुक्यातील दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला होता. यातच आज पाच दिवसांच्या शिशूचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com