तर कशी तुटणार करोनाची चेन

तर कशी तुटणार करोनाची चेन

संचारबंदीच्या आदेशाची बेजबाबदारांकडून पायमल्ली

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या वाढत्या संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे.

परंतु शहरात नागरिक विनाकारण रस्त्यांवर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आज सकाळपासून शहरात दिसून आले. त्यामुळे एकीकडे शासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी केली जात आहे तर दुसरीकडे नागरिकांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे. यामुळे बेजबाबदार जळगावर केव्हा सूज्ञ होतील असे वाटू लागले आहे.

जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. दिवसाला लाखोच्या संख्येत दररोज रुग्ण वाढत असून मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील हजारोंच्या संख्येत होवू लागली आहे.

अनेक रुग्णांना बेड, औषधी मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अशी परिस्थिती असतांना तसेच कोरोनाचा संसर्ग रोखून त्याची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सायंकाळपासून राज्यात संचारबंदीची घोषणा केली. यात त्यांनी नागरिकांना रस्त्यावरील गर्दी कमी करुन विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले होते. परंतु नागरिकांकडून त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली असून पहिल्याच दिवशी नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरतांना दिसून आले.

करोनाची साखळी कशी ब्रेक होणार ?

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेकच झाला आहे. प्रत्येक तालुक्यासह गावागावात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहे. यातच प्रशासनाकडून निर्बंध घालून देण्यात आले असले तरी नागरिकांकडून त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.तसेच अनेक भागांमध्ये नागरिक बिनधास्त विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगावकरांच्या अशा वागणुकीमूळे कोरोनाची साखळी कशी ब्रेक होणार असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.

पोलिसांची भूमिका केवळ बंदोबस्तापुरतीच

शासनाकडून संचारबंदीचे आदेश मिळताच पोलिस प्रशासनाकडून शहरातील चौकाचौकांमध्ये प्रचंड तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज सकाळी देखील नेहमीप्रमाणे पोलिस चौकात बंदोबस्तासाठी उभे होते. परंतु रस्त्यावर नागरिकांची ये-जा सुरु झाल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी न करता केवळ ते बंदोबस्तासाठी उभे असल्याचे चित्र शहरात दिसून आले. त्यामुळे पोलिसांची भूमिका ही केवळ बंदोबस्तासाठी पुरतीच आहे का असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे.

भाजी खरेदीसाठी गर्दी

संचारबंदीत भाजी विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेत आहे. शहरातील काही भागात ठिकठिकाणी भाजी विक्रेते भाजीपाला विक्री करीत आहे. पोलिसांकडून मुख्य रस्त्यावर त्यांना भाजी विक्रीस मज्जाव केल्याने या विक्रेत्यांनी शहरातील गल्ली बोळात आपले बस्तान मांडले होते. त्यामुळे याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com