वाटेल तेवढे पैसे घ्या... पण, एक तरी रेमडेेसिविर द्या !

रुग्णांच्या नातेवाईकांची केली जातेय लूट; प्रशासन मूग गिळून गप्प
वाटेल तेवढे पैसे घ्या... पण, एक तरी रेमडेेसिविर द्या !

अमोल कासार - Jalgaon - Amol Kasar :

जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा कायम आहे. अशातच आपल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हव्या त्या पद्धतीने प्रयत्न करीत असतांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पाहिजे तेवढे पैसे मोजायला तयार आहे.

तर दुसरीकडे याच मजबुरीचा फायदा घेत रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रुग्णांच्या नातेवाईकांकडून पाहिजे तेवढे पैशांची मागणी करीत त्यांची लूट करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

रुग्णांची नातेवाईक देखील ‘दादा, भाऊ पाहिजे तेवढे पैसे घ्या.. पण एकतरी इंजेक्शन द्या’! अशी विनवनी करतांनाचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रारी होत असल्याप तरी प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

करोनाबाधित रुग्णावर उपचारदरम्यान संजवनी समजले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णांना या इंजेक्शन लिहून दिले जात आहे.

परंतु बाजारपेठेत हे इंजेक्शनच मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड फरपट होत आहे. ही फरपट थांबण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी खासगी डॉक्टरांनीच त्यांच्या रुग्णालयातील रुग्णांना आपल्या माध्यमातून हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे आदेश काढले आहे.

मात्र तरी देखील खासगी डॉक्टर या इंजेक्शनासाठी नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी लिहून देत असल्याने हे आदेश केवळ कागदोपत्रीच आहेत का असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

इंजेक्शनासाठी मिळतेय मागेल तेवढी किंमत

रेमडेसिविरचा तुटवडा असतांना देखील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून रेमडेसिविरचे इंजेक्शनची लिहून दिले जात आहे. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी या इंजेक्शनचा जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात प्रचंड साठा करुन ठेवला होता.

आता या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता या साठेबाजांकडून हे इंजेक्शन विक्रीसाठी काढले आहे. दरम्यान एका इंजेक्शनासाठी रुग्णाच्या नातेवाईकांला साठेबाज मागेल तेवढी किंमत मोजण्यास तयार असल्याने साठेबाजांकडून रुग्णांची लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनच अनभिज्ञ

डॉक्टरांनी इंजेक्शनासाठी चिठ्ठी लिहून दिल्यानंतर रुग्णाचे नातेवाईकांकडून आपल्या मित्र परिवाराकडे या इंजेक्शन मिळण्याबाबत मदत मागत आहे. अनेकांना चोपडा तालुक्यात हे इंजेक्शन मिळत असून असल्याची माहिती मिळत आहे.

अनेक परजिल्ह्यातील रुग्णांंच्या नातेवाईकांनी चोपड्यातून इंजेक्शन खरेदी केल्याचे प्रकार देखील उघडीस येत आहे. मात्र आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन या गोष्टींबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

नोडल ऑफिसर केवळ नावालाच का ?

रेमडेसिविरचा काळाबाजार थांबविण्यासाठी प्रशासनाकडून नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे. तसेच उपलब्ध होणारे हे इंजेक्शनाची रितसर नोंदणी करुन त्याचे वाटप करण्याचे संपूर्ण अधिकार अन्न व औषध प्रशासन निरीक्षक अनिल माणिकराव यांना दिले आहे.

परंतु तरी देखील खासगी रुग्णालयासह साठेबाजांकडून या इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याने जिल्हाधिकारीे याबाबत कठोर भूमिका घेणार की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com