‘सिव्हिल’ ऑक्सिजनवर

275 रुग्णांचा जीव टांगणीला : प्रशासनाची त्रेधातिरपीट
‘सिव्हिल’ ऑक्सिजनवर

जळगाव - Jalgaon :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधील ऑक्सिजन गुरुवार, 13 रोजी सायंकाळी साडेसात वाजता पूर्णपणे संपल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

लिक्विड ऑक्सिजनचे टँकर वेळेत दाखल न झाल्याने रुग्णालयात आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती. खासगी ऑक्सिजन कंपनीकडून मागविण्यात आलेल्या सिलिंडरवर रुग्णालयातील ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या 275 रुग्णांना वाचविण्यासाठी अधिष्ठातांसह डॉक्टरांचे उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते. यावेळी लिक्विड ऑक्सिजनच्या टँकरवरील चालकाशी संपर्कही होत नसल्याने जिल्हा प्रशासनाचे चांगलेच ठोके वाढले होते.

अन् धावपळ सुरु झाली.....

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेले एकूण 330 कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर उपचार घेत आहेत. त्यापैकी 275 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकवर अवलंबून आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता रुग्णालयातील ऑक्सिजन टँक हा पूर्णपणे संपला. ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल यांनी याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दिली. रामानंद हे तत्काळ ऑक्सिजन टँक असलेल्या ठिकाणी कर्मचार्‍यांसह दाखल झाले.

टँकरवरील चालकाशी संपर्क होईना...

लिक्विड ऑक्सिजनच्या टँकरवरील चालकाने लोकेशन नोडल अधिकारी यांना माहिती देणे अपेक्षित असते. मात्र, एकीकडे रुग्णालयातील ऑक्सिजन टँक संपलेला असताना दुसरीकडे लिक्विड ऑक्सिजनच्या टँकरवरील चालकाशीही संपर्क होत नव्हता. त्यामुळे अधिष्ठातांसह कर्मचार्‍यांची धाकधूक वाढली. यानंतर पोलीस कंट्रोल रुमव्दारे लिक्विड ऑक्सिजन टँकरसोबत असलेल्या पोलीस बंदोबस्तांकडून नेमके टँकर कोणत्या ठिकाणी आहे? याची माहिती घेण्यात आली. साडेदहा वाजता टँकर पारोळानजीक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अधिष्ठांतांसह कर्मचार्‍यांचा जीव भांड्यात पडला.

बॅक-अपचे असलेले 100 सिलिंडरही संपले

खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी बॅकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या 100 ऑक्सिजन सिलिंडरद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर 3 तासांनी ते सिलिंडरदेखील संपले. त्यानंतर पुन्हा खासगी ऑक्सिजन पुरवठादारांकडून 100 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून घेण्यात आले. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, म्हणून बॅक-अप ऑक्सिजन सिलिंडरऐवजी आणखी ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

आजचा दिवस निघाला; उद्याचे काय ?

टँकर पोहोचेपर्यंत सद्यःस्थितीत रुग्णालयातील सर्व रुग्णांना बॅक-अप ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. लिक्विड ऑक्सिजनचा टँकर दाखल होण्यास उशीर झाल्याने ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, लिक्विड ऑक्सिजन टँकर पोहरोचून तो टँकमध्ये सिलिंडर भरेल. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची 20 टनची क्षमता आहे. मात्र, त्यात 16 ते 19 टन एवढा ऑक्सिजन भरला जातो. हा साठा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनवर असलेल्या 275 रुग्णांना 48 तासांपर्यंत पुरतो. आता लिक्विड टँकर पोहोचून 48 तास पुरेल एवढा पुरेसा साठा होईल. मात्र, टँकर रिकामे होऊन पुन्हा येईपर्यंत ऑक्सिजनचे काय? पुन्हा टँकर येईपर्यंत पुरवठादाराकडून आवश्यक ते सिलिंडर उपलब्ध होतील काय? असेही प्रश्न यावेळी उपस्थित झाले.

नोडल अधिकारी मात्र अनभिज्ञ

जिल्ह्यात कोरोना काळात जिल्हा नोडल अधिकारी म्हणून डॉ. नागोराव चव्हाण यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यात वार्‍यासारखी बातमी पसरलेली असतानाही डॉ. चव्हाण यांनी अधिष्ठातांना फोनवरुन नेमका काय प्रकार झाला, अशी विचारणा केली. एकीकडे आणीबाणीत कसरत सुरु असताना दुसरीकडे डॉ. चव्हाण यांनी नेमकी काय परिस्थिती आहे? हे प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेण्याचीही तसदीही घेतली नाही. दरम्यान, नोडल अधिकारी असताना त्यांच्याकडून अशा पध्दतीचा बेजबाबदारपणाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, डॉ. चव्हाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ऑक्सिजन साठ्याबाबत लेखी माहिती दिली जात असते. यानंतर डॉ. चव्हाण यांनी संबंधित लिक्विड ऑक्सिजनचा टँकरबाबत आढावा घेणे गरजेचे असते. नेमका टँक संपला तरी टँकरबाबतची कुठलीही माहिती डॉ. चव्हाण यांच्याकडे नसल्याचेही यावेळी दिसून आले. नोडल अधिकारी असल्याने त्यांच्याकडून माहिती घेणे अपेक्षित असताना ते अधिष्ठातांना विचारुन माहिती घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.

घाबरण्याचे कारण नाही - जिल्हाधिकारी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँकवर 275 रुग्ण अवलंबून आहेत. अचानक टँक संपल्याने पुरवठादाराकडून 200 सिलिंडर उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे. 6 तास पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. घाबरण्याची गरज नसून सद्यःस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधील साठा संपल्याचे वृत्त सोशल मीडियातून प्रसारित होत आहेत. प्रत्यक्षात सद्यःस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांना पुढील 18 ते 24 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठ्याची तरतूद प्रशासनाने केली आहेत. ऑक्सिजन पुरेसा असल्याने रुग्ण, नातेवाईक यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहेत.

अधिष्ठातांसह कर्मचारी होते ठाण मांडून

अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्यासह उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल, कार्यालयीन अधीक्षक संजय चौधरी, डॉ. समीरण चव्हाण, डॉ. मंदार पाटील हे सर्व ऑक्सिजन टँक असलेल्या ठिकाणी ठाण मांडून होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक संपल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही फोनवरुन अधिष्ठांकडून माहिती जाणून घेतली. अधिष्ठातांसह कर्मचार्‍यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही वॉर्डात जाऊन पाहणी केली.

रात्री 1 वाजता ऑक्सिजनचे टँकर पोहोचले रुग्णालयात

दोन महिन्यांपूर्वी ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला आहे. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच तो पूर्णपणे रिकामा झाला. लिक्विड ऑक्सिजनचा टँकर वेळेत दाखल न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे एकमेकांच्या संपर्कात आहेत. शेवटचे वृत्त हाती येईल तोपर्यंत लिक्विड ऑक्सिजनचा टँकर एरंडोलच्या बाहेर असल्याची माहिती मिळाली होती. रात्री 1 वाजता ते टँकर जळगाव जिल्हा रुग्णालयात पोहोचले त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com