शासकीय खरेदी लांबली : कापसाची कमी भाव

शासकीय खरेदी लांबली : कापसाची कमी भाव

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

पांढरे सोने उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा अशी ओळख असून खान्देशात यावर्षी कापूस खरेदी हंगाम शासनाकडून ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोंव्हेंबरच्या सुरूवातीसच कापूस खरेदी होणार असल्याचे चर्चेत होते. मात्र, या हंगामातील...

शेतकर्‍यांकडील वेचणी झालेल्या कापसाची मोठया प्रमाणात खाजगी व्यापार्‍यांकडून अत्यंत कमी दराने खरेदी केली जात असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. वरातीमागून घोडे या उक्तीप्रमाणे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केल्यानंतर 15 ते 20 नोव्हेंबर दिवाळीनंतर शासनाकडून कापूस खरेदीसाठी मुहूर्त होणार असल्याचे सुत्रांकडून बोलले जात आहे.

खान्देशात दिवाळी सण तोंडावर आला असून रब्बी हंगामासाठी मशागतीसह हरबरा, गहू, मका, संकरीत ज्वारी-शाळू आदी वाणांची पेरणी सुरू असून बी-बीयाण्यांठी होणार्‍या खर्चाची निकड भागविण्यासाठी शेतकर्‍यांनी वेचणी केलेला कापूस मिळेल त्यादराने व्यापार्‍यांना देण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरीवर्गाकडून बोलले जात आहे.

शासनाकडून चांगल्या प्रतिच्या आणि किमान 10 ते 12 टक्क्यांच्या आतच आर्द्रता असलेल्या कापसाची खरेदी करण्याचे निकष असल्याने यंदाच्या कापूस उत्पादनाला बाजारात व्यापार्‍यांकडून अत्यंत कमी दरात मागणी केली जात आहे.

गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाकडून कापूस खरेदी संदर्भात पणन महासंघ पदाधिकारी आणि अधिकारी वर्गाच्या झालेल्या बैठकीत जळगाव विभागात पणनच्या चार तर सीसीआयतर्फे 10 अशा 14 केन्द्रांवर दिवाळीनंतर 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कापसाची खरेदी होणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

जळगाव विभागात धरणगाव, कासोदा, पारोळा आणि मालेगाव असे चार तर सीसीआयच्या जळगाव, एरंडोल, बोदवड, पहूर, शेंदूर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगांव, जामनेर आणि भुसावळसह 10 असे एकूण 14 केन्द्रांवर कापूस खरेदी होणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्य आपत्ती मदत प्रतिसाद निधी अंतर्गत जळगाव जिल्हयाला 1194.04 लाख रूपयांचा मदत निधी देण्याचे शासन निर्णय दि.11 सप्टेंबरनुसार जाहिर करण्यात आले होते. ती मदत देखिल जिल्हा प्रशासनास अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे चित्र सर्वत्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com