जळगाव

वाळूमाफियांचा त्रास अनावर ; ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पेटविले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पिंपळगाव (ता.भडगाव) येथील ग्रामस्थांनी काल रात्री बारा वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात वाळू भरणारे ट्रॅक्टरच ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची चर्चा आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूकीचा प्रश्न समोर आला आहे.

काल रात्री बारा वाजेच्या सुमारास पिंपळगाव ( ता.भडगाव) येथील गिरणा नदी पात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू भरत असल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यामुळे ग्रामस्थांनी नदिपात्रात धाव घेत ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच ग्रामस्थ अवैधरित्या वाळू वाहतुकीच्या विरोधात एवढे टोकाचे पाऊल उचलले आहे.

ग्रामस्थ एकटवले पिंपळगाव येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतुकीबाबत ग्रामस्थांनी महसुल प्रशासनाकडे यापुर्वी तक्रार केली आहे. मात्र तरीही वाहतुक बंद होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी वाळू भरण्यासाठी आलेले ट्रॅक्टरच पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गिरणा परीसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रात्री महसुल प्रशासनाकडुन कोणीही पोहचले नव्हते. तर पोलिस स्टेशनलाही याबाबत कुठलीही नोंद नाही. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात काय भुमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान हे ट्रक्टर कोणाचे ते समजू शकले नाही. तर सदरचे ट्रॅक्टर हे वाळूच भरण्यासाठीच आले होते की, अन्य ठीकाणी जात होते हे कळू शकलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संशयावरून ट्रॅक्टर तर जाळले नाही ना? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेत तक्रारदार म्हणून कोणीही पुढे आलेले नाही. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. वाळूमाफियांचा त्रास अनावर झाल्याने शेवटी ग्रामस्थांना टोकाचे पाऊल उचलावे लागले. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com