जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू आहे. मात्र, बाजार समिती सुरू असल्याने नेहमीप्रमाणे आज जिल्हाभरातील शेतकरी आपापला भाजीपाल्याचा माल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले.

मात्र, जनता कर्फ्यूमुळे शहरातील किरकोळ व्यापारी माल खरेदी करण्यासाठीच आले नसल्याने शेतकर्यांचा माल विक्री झाला नाही. त्यामुळे माल पडून असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

या नुकसानाला जबाबदार कोण तसेच नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी करत शेतकर्यांंनी 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनावर रोष व्यक्त केला.

तसेच बाजार समिती प्रशासनाला धारेवर धरत बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

करोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव शहरात 11 मार्च रात्री आठ वाजेपासून ते 15 मार्च सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार जनता कर्फ्यू राबविण्यात येत आहे.

यादरम्यान जीवनाश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असून दुसरीकडे मात्र बाजार समिती सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. बाजार समिती सुरू राहणार असल्याने साहजिकच जिल्हाभरातील शेतकरी शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपापला भाजीपाल्याचा माल गाड्यांमध्ये भरुन विक्रीसाठी जळगाव बाजार समितीमध्ये दाखल झाले.

मात्र, जनता कर्फ्यूमुळे शहरातील किरकोळ व्यापारी माल खरेदी करण्यासाठी बाजार समितीमध्ये फिरकलेच नाही.

त्यामुळे शेतकर्यांनी आणलेल्या मालाची विक्री न झाल्यामुळे गाड्यांच्या गाड्या भरून शेतकर्यांंचा माल तसाच पडून राहिला व लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांंनी बाजार समिती प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला.

जनता कर्फ्यूमुळे सर्व बंद असताना बाजार समितीही बंद ठेवायला हवी होती. किरकोळ व्यापार्यांना विक्रीसाठी बंदचे आदेश व दुसरीकडे बाजार समिती सुरू यामुळे संभ्रम आहे. एक तर किरकोळ विक्री करणार्या जनता कर्फ्यूदरम्यान माल खरेदी-विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी नाहीतर बाजार समितीही बंद ठेवावी, अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली.

शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे हमाल मापाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांनी सांगितले.