महामार्गावर मनपा कर्मचारी ठार

अपघात । शिव कॉलनी उड्डाणपुलावरील घटना; दोन दिवसांत महामार्गाचा दुसरा बळी
महामार्गावर मनपा कर्मचारी ठार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील शिव कॉलनीजवळच्या रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत नारायण मांगो हटकर (वय-58) रा. नंदनवन कॉलनी या महापालिका कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 24 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रभात कॉलनी येथील लीना तळेले या महिलेचा महामार्गावर बॉम्बे बेकरीसमोर अपघातात मृत्यू झाला होता.

एक दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा चौपदरीकरणाच्या प्रतिक्षेतील महामार्गाने दुसरा बळी घेतला आहे.

घरी जेवणाला जात होते

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मांगो हटकर (वय-58) रा. नंदनवन कॉलनी हे महानगरपालिकेत पुरवठा विभागात कामाला आहे.

ते शहरात पाणी सोडण्याचे काम करतात. आज सकाळी 10 वाजता ते कामावर हजर झाले. दुपारी त्यांनी कोल्हे नगर परिसरात पाणीपुरवठ्याचे काम आटोपल्यानंतर दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीई 3108) ने जेवणासाठी नंदनवन कॉलनी येथे जेवणासाठी घरी जात असतांना शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ मागून येणार्‍या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली.

यात ते गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.

मुलाला वडिलांच्या अपघाताचा फोन

मयत नारायण हटकर यांचा मुलगा पवन हटकर हा रिक्षातून प्रवासी वाहतूक करतो. नंदनवन कॉलनीकडून गावात पवन आपल्या बहिणीसोबत कामानिमित्त गावात जात असतांना शिवकॉलनीजवळ नारायण हटकर दुचाकीवरून जात असल्याचे दिसले.

वडील हे जेवण्यासाठी जात असल्याचे पवनच्या लक्षात आले. यानंतर तो काही अंतरावर पोहचल्यावर पवनला वडीलांचा अपघात झाल्याचा फोन आला.

पवनने आहे त्या ठिकाणावरुनच रिक्षा वळविली व अपघातस्थळी धाव घेतली. व तातडीने पवन तसेच बहिण आशा यांनी जखमी अवस्थेत पडलेले वडील नारायण हटकर यांना रिक्षातूून खासगी रूग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वाटेतच हटकर यांची प्राणज्योती मालविली. यानंतर जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com