जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या लग्नाहून घराकडे परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने लीना किशोर तळेले वय 52 रा. प्रभात कॉलनी या महिलेला चिरडल्याची घटना सायंकाळी सहा वाजता बॉम्बे बेकरीसमोर घडली.

या अपघात दुचाकीस्वार पती जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर आयशर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला होता. अपघातामुळे काही काळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता.

डोक्यावरुन गेले आयशरचे चाक

शहरातील प्रभात कॉलनी येथे किशोर तळेले हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. बांभोरी परिसरातील असलेल्या केबीएक्स या कंपनीत ते नोकरीला आहेत.

गुरुवार, 24 डिसेंबर रोजी शहरातच अजिंठा चौफुली परिसरात लग्न असल्याने त्या लग्नासाठी किशोर तळेलेे हे पत्नी लीना यांच्या समवेत दुचाकीवरुन (क्रमांक. एम.एच. 19 डी.सी. 6025) गेले होते.

लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यावर तळेले सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रभात कॉलनी येथील घराकडे निघाले. यादरम्यान अजिंठा चौक पार केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे बेकरी समोर अज्ञात आयशरने तळेले यांच्या दुचाकीस धडक दिली.

यात मागे बसलेल्या लीना तळेले या तोल जावून रस्त्यावर पडल्या. यानंतर त्यांच्या डोक्यावरुन आयशरचे चाक गेल्यााने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एमआयडीसी पोलिसांकडून मदतकार्य

घटनेेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, इमरान बेग, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, तुषार चौधरी यांनी घटनास्थळ गाठले.

तसेच रस्त्यावरील दुचाकी बाजूला केली. तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

तसेच जखमी दुचाकीस्वार किशोर तळेले यांना खाजगी रुग्णालयात हलविले. त्याच्या किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुले जळगावकडे रवाना

दरम्यान आज योगायोगाने लीना तळेले यांचे बदोडा येथील भाऊ आज कामानिमित्ताने जळगावात आले होते. त्यांनाच या अपघाताबाबत तळेले यांच्या मोबाईलवरुन पोलिसांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला.

दरम्यान अपघातानंतर वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी वाहतुक सुरळीत केली. दरम्यान लीना यांच्या पश्चात पती किशोर तळेले तसेच दोन मुले चंदन व कुंदन असा परिवार आहे.

चंदन हा नोकरीनिमित्ताने पुण्याला तर लहान मुलगा कुंदन हा मुंबई येथे आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोघेही जळगावकडे रवाना झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.