देवदर्शनाहून परततांना अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी स्लीप होवून ममुराबादजवळ झाला होता अपघात
देवदर्शनाहून परततांना अपघातात तरुणाचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

यावल तालुक्यातील डांंभूर्णी येथील निंबादेवी हिच्या दर्शनाहून जळगावकडे परततांना दुचाकी घसरुन दुचाकीस्वार मुकेश नारायण निकम वय 32 रा. समतानगर, जळगाव हा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, 20 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबादजवळ घडली होती.

जखमी मुकेश पाटील या तरुणाचा बुधवारी 21 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मुकेश पाटील हा मंगळवारी सकाळी 11 वाजता मित्र सतीश विजय संदानशिव याला सोबत घेवून दुचाकीने यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील निंबादेवी या देवस्थानावर दर्शनासाठी गेला होता.

त्याठिकाणी दर्शन आटोपल्यानंतर सायंकाळी 4 वाजता दुचाकीने पुन्हा जळगावकडे परत निघाले. यादरम्यान समोरुन येणार्‍या दुचाकीच्या धडकेपासून स्वतला वाचविण्याच्या प्रयत्नात मुकेश याची दुचाकी घसरली. दुचाकी घसरुन दोघेही मुकेश व सतीश हे दोघेही रस्त्यावर पडले. यात मुकेश गंभीर जखमी झाला होता, तर सतीश किरकोळ जखमी झाला होता.

चिमुकल्याचे पितृछत्र हरपले

मुकेशला उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात व तेथून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असतांना बुधवार, 21 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुकेशचा मृत्यू झाला.

मुकेश हा गणेश कॉलनी परिसरातील एका वाईन शॉपच्या दुकानावर कामाला होता, त्याच्या पश्चात पत्नी सीमा, मुलगा कृष्णा (वय 1 वर्ष), दोन भाऊ दिनेश व महेश असा परिवार आहे. मुकेशच्या मृत्यूने 1 वर्षाचा चिमुकला कृष्णा याचे पितृछत्र हरपले आहे.

याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचे घटनास्थळ जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत असल्याने या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com