अपघातांमध्ये दहा दिवसात 11 ठार

धक्कादायक । चौपदरीकरणानंतरही अपघात थांबण्याऐवजी होतेय वाढ
अपघातांमध्ये दहा दिवसात 11 ठार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरालगत तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यमार्ग तसेच महामार्गावर वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा दिवसांमध्ये 11 जण ठार झाले आहेत. विेशेष म्हणजे मयतांमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने असलेला समावेश ही खेदजनक बाब आहे.

महामार्ग तसेच राज्यमार्गावर वाढत्या अपघातांबाबत अनेक प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. काही रस्त्याचे चौपदरीकरणही सुरु असून काहींचे पूर्ण झाले आहेत.

चौपदरीकरणानंतर अपघात कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने केवळ रस्तेच नाही तर वाहतूक नियमांचे सक्तीची अंमबजावणी होणे गरजेचे आहे. सक्तींची अंमबजावणीकडे प्रशासनाचेच दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून त्याचे पालन होणार तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याच्या पोलीस दलाच्या ताफ्यात वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक इंटरसेफ्टर व्हेईकल ही अत्याधुनिक वाहने दाखल झाली.

जळगाव जिल्ह्यातही सात वाहने देण्यात आली आहे. या वाहनांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणार्‍या वाहनांवर कारवाईसाठी हायटेक अशा सुविधा आहेत.

त्यात म्हणजे वाहन किती दूर असले तरी वेगमर्यादा ओळखणे, वाहन थांबत नसले तर थेट त्याच्या नंबर प्लेटचा फोटो काढून दंडाचे चलन घरपोच पोहचणे अशा काही गोष्टींचा या वाहनांत समावेश आहे.

आता जिल्ह्याच्या जळगाव पाचोरा, जळगाव जामनेर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या तीनही ठिकाणचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. साहजिकच चौपदरीकरण झाल्याने वाहनांचा वेगही वाढला आहे.

अपघातामध्ये प्रमुख बाब म्हणजे वाहनांचा वेग, त्याची त्या त्या वाहनांना मर्यादा रस्त्यानुसार ठरवून देण्यात आली आहे. महामार्गावर स्वतंत्र महामार्ग पोलीस कार्यरत, इंटरसेफ्टर व्हेईकल असतांना वेगाने धावणार्‍या कुठल्याह वाहनांवर नियमित कारवाई होतांना दिसत नाही. नियमित कारवाई झाली तर वाहनधारकांमध्ये धाक निर्माण होईल, मात्र कारवाईची भिती नसल्याने वाहनधारकही सुसाट धावत असल्याने त्यातूनच मोठे अपघात घडत असल्याचे चित्र आहे. वाहनाच्या धडकेत थेट शरीराचे तुकडे होत असल्याने त्यावरुन धडक देणार्‍या वाहनाचा वेग किती भयानक असणार याची कल्पना येते.

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठका नावालाच

जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याला किंवा तीन महिन्यातून रस्ते सुरक्षा समितीची बैठक होते. या समितीचे जिल्हाधिकारी हे स्वतः अध्यक्ष आहेत. पोलीस,वाहतूक शाखा, आरटीओ विभाग, महामार्ग प्राधीकरण या विभागांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित असतात. या बैठकीत वाढते अपघात, अपघातांमधील मृत्यूची संख्या, त्याबाबत उपाययोजना याबाबत निर्णय, नियमांची अंमबजावणी याबाबत निर्णय होणे अपेक्षित असते.

मात्र केवळ कागदोपत्रीच या बैठका होत असल्याचेही बोलले जात आहे. एखादी मोठा अपघात झाला की यंत्रणा जागी होते, त्यानंतर काही दिवस वाहनांच्या तपासणीतून कारवाईचा देखावा केला जातो, मग पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. ना आरटीओ विभागाकडून अवजड वाहनांवर नियमित कारवाई होते.

ना भरधाव धावणार्‍या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होते. आता कारवाई न करणार्‍या विभागांवर जिल्हाधिकारी कारवाईची हिंमत दाखविणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघातांमध्ये चूक कोणाची ?

जिल्ह्यात अपघातात मृत्यू होणार्‍यांची संख्या मोठी आहे. दहा दिवसात 11 जण ठार म्हणजे जिल्ह्यात दरदिवशी अपघातात एक ते दोन जणांचा मृत्यू होत आहे. अपघातांचा विचार केल्यास 100 टक्के अपघात हे असे असतात की त्यात मयत दुचाकीस्वाराचीच चूक असते. 10 टक्के अपघातात फक्त समोरील चारचाकीसह इतर वाहनाची चूक असते. हे झालेल्या अपघातांवरुन समोर आले आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात, मद्यप्राशन करुन वाहने चालविणे, ट्रीपल सीट वाहने चालविणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर बोलणे, हेडफोनलावून दुचाकी चालविणे अशी प्रमुख अपघातांची कारणे आहेत. काही घटनांमध्ये स्त्याची दुर्दशा, रस्त्यावर दिशादर्शक फलक नसणे हे सुध्दा अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

अपघातांमध्ये मृत्यू होणार्‍यांमध्ये तरुण सर्वाधिक

महामार्ग तसेच शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून अपघातांची मालिका सुरु झाली आहे. दहा दिवसात रस्ता अपघातात शहर व परिसरात 11 जण ठार झाले आहेत. नशिराबादनजीक 8 जुलै रोजी झालेल्या अपघातात अभीजीत पसारे व पवन बागुल हे दोन तरुण ठार झाले होते. त्यानंतर 10 जुलै रोजी वेलेजवळ झालेल्या अपघातात हर्षल पाटील व नितीन भील हे दोन तरुण ठार झाले होते.

11 जुलै रोजी नशिराबादजवळ एक जण ठार झाला. 12 जुलै रोजी पाळधी, ता. जामनेरजवळ पंकज तावडे, धनंजय सपकाळे व प्रवीण पाटील हे तीन जण ठार झाले. 13 रोजी शिरसोली-रामदेववाडी रस्त्यावर लालसिगं चव्हाण हा तरुण ठार झाला तर 14 रोजी बांभोरीजवळ कडू धनगर हे दुचाकीस्वार ठार झाले.

आज 17 जुलै रोजी शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रासमोर चारचाकीच्या धडकेत संतोष रमेश पाटील हा तरुण ठार झाला आहे. आठवडाभरापासून रोज अपघात होत असून त्यात मृत्यू होणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या ही सर्वाधिक असल्याची दुर्देवी बाब आहे.

अधिकारी बदललेत की नियम बदलतात

गेल्या काही वर्षापूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे हे रुजू झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला हेल्मेट सक्ती केली होती. नियम मोडल्यास जागेवरच पाचशे रुपये दंड होता. आपल्या विभागापासून सुरुवात करुन त्यांनी ही शहरासह जिल्ह्यातही ही मोहिम राबवायला सुरुवात केली होती. त्यांची बदली झाल्यानंतर, त्याकडे दुर्लक्ष झाले.

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली तरच मृत्यू होत असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहेत. त्यामुळे महामार्ग राज्य मार्गावर प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करावी. हेल्मेटची सक्ती झाल्यास अपघातातील मृत्यूचे प्रमाण होईल. याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य असणेही गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com