ओव्हरटेकच्या नादात आयशरने मजुराला चिरडले

शिरसोली रोडवर हनुमान मंदिराजवळील घटना : मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर पडून
ओव्हरटेकच्या नादात आयशरने मजुराला चिरडले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

वावदड्याकडे बांधकामाच्या ठिकाणी जात असलेल्या मजुराच्या दुचाकीला ओव्हरेटक करण्याच्या नादात चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार लालसिंग वालसिंग चव्हाण वय 33 रा. मूळ जंगलतांडा ता. सोयगाव, ह.मू. देवीदास कॉलनी जळगाव या मजुराचा मृत्यू झाला आहे.

मंगळवार 13 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव पाचोरा रस्त्यावरील शिरसोली गावानजीक हनुमान मंदिराजवळ अपघात झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने तब्बल दीड ते दोन तास मृतदेह जागेवरच पडून होता. अखेर जैन इरिगेशनची रुग्णवाहिका मिळाल्याने मृतदेह सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

मेंदू अन् डोळा पडला होता रस्त्यावर

गेल्या आठ ते दहा वर्षापासून लालसिंग चव्हाण हे जळगाव शहरातील देविदास कॉलनी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वावदड्याकडे बांधकाम सुरु आहे, याठिकाणी मंगळवारी चव्हाण हे त्यांची दुचाकी क्र. एम.एच 19 डी.सी. 5102 ने जात होते. शिरसोलीनजीक असलेल्या हनुमान मंदिराजनीक ओव्हरेटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्‍या चारचाकी क्रमांक एम.एच.12 आर.एन. 7599 ने चव्हाण यांना चिरडले.

चारचाकीची धडक एवढी जोरदार होती की, चव्हाण याचा एक डोळा तसेच डोक्यातील मेंदू रस्त्यावर येवून पडला होता. अपघातानंतर चारचाकीचालक घटनास्थळाहून पसार झाला. रस्त्यालगत शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी घटनास्थळ गाठले. चव्हाण यांच्याकडील मोबाईलमध्ये मिळून आलेल्या क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानुसार चव्हाण याचे शालक सतीष राठोड तसेच नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले.

जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेतून आणला मृतदेह

अनेक रुग्णवाहिकांशी संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका मिळून आली नाही. रुग्णवाहिकेअभावी तब्बल दीड ते दोन तास मृतदेह जागेवरच पडून होता. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, इमरान बेग, संदीप पाटील या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले.

जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला व त्यातून सायंकाळी साडेसहा वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत चव्हाण यांच्या पश्चात पत्नी सुमित्राबाई, दोन मुले अविनाश व केवल, व दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. भाऊ, बहिण हे मूळगावी जंगलातांडा येथे वास्तव्यास आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com