चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही मित्रांचा मृत्यू

चोपडा तालुक्यतील वेलेगावाजवळ अपघात : एक जण जखमी
चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही मित्रांचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

चोपडा तालुक्यातील वेलेगावाजवळ बहिणीला भेटून घरी परतत असताना समोरुन येणार्‍या चारचाकीेने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील हर्षल भिका पाटील (वय 19) व नितीन निंबा भील (वय 23) दोन्ही रा. रा.वाघळूद, ता.धरणगाव या दोघांचा मृत्यू झाला. तर ऋषीकेश छोटू पाटील (वय 21, रा.वाघळूद, ता.धरणगाव) हा तरुण जखमी झाला. शनिवार, 10 जुलै रोजी दुपारी तीन वाजता हा अपघात घडला. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं मित्र शनिवारी दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.सी.7804) चोपडा येथे असलेल्या ऋषीकेशच्या बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. भेट घेतल्यानंतर पुन्हा घराकडे परतत असताना चोपडा तालुक्यातील वेले गावाजवळ समोरुन येणार्‍या चारचाकीने (क्र.एम.एच.18 ए.बी.2303) दुचाकीला धडक दिली.

चारचाकीची धडक एवढी जोरदार होती की, धडकेत दुचाकीवरील तिघं जण फुटबॉलसारखे दूरवर फेकले गेले. यात नितीन याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल व ऋषीकेश या दोघांना जखमी अवस्थेत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

प्रकृती चिंताजनक असल्याने हर्षल याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले.

दोघेही तरुण होते घरचे एकुलते

ऋषीकेश याच्यावर चोपड्यात उपचार सुरु असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. मयत नितीन याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते तर हर्षल व ऋषीकेश हे अविवाहित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तिघांचे आई, वडील मजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात.

हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं आपआपल्या कुटुंबात एकुलते होते. हर्षल व नितीनच्या मृत्यूची बातमी समजताच जळगावातील नातेवाईक व गावावरी कुटुंबियांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com