भरधाव डंपरच्या धडकेत दूध संघाच्या कामगाराचा मृत्यू

शिवकॉलनी स्टॉपजवळ अपघात : दुचाकीस्वार कामगार तरुण जखमी
भरधाव डंपरच्या धडकेत दूध संघाच्या कामगाराचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मित्राला सोडण्यासाठी निवृत्तीनगरात त्याच्या घरी जात असतांना दुचाकीला भरधाव डंपरने मागून जोरदार धडक दिल्याने अपघातात श्याम सुरेश पाटील (37, निवृत्ती नगर) हा जिल्हा दूध संघाचा कामगार तरुण जागीच ठार झाला.

तर दुचाकीस्वार परेश रवींद्र पाटील (29, संभाजी नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता महामार्गावरील शिव कॉलनी थांब्याजवळ हा अपघात झाला. जखमी परेश पाटील याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी आज बुधवारी सकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फरार डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

परेश पाटील व श्याम पाटील दोघेही मित्र असून दूध फेडरेशनमध्ये कामाला होते. परेश हा फिटर आहे तर शाम हा इलेक्ट्रीशिअन म्हणून कामाला होता. मंगळवारी रात्री शाम पाटील याने परेशला मोबाईलवरुन फोन करुन मला जैनाबादमध्ये घ्यायला असे सांगितले.

त्यानुसार परेश दुचाकीने (क्रमांक एम.एच.19 सी.टी.0591) जैनाबाद येथे गेला. येथून शाम यास निवृत्तीनगर येथे घरी सोडण्यासाठी जात असतांना महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेला श्याम खाली फेकला जावून डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर परेश लांब फेकला गेला. या घटनेत श्यामचा जागीच मृत्यू झाला. तर परेशच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागला. या घटनेची माहिती मिळताच श्यामचा भाऊ अजय पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, हितेश भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दोघांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविले. तेथे श्यामला मृत घोषित करण्यात आले तर परेश याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याच्या उजव्या भुवईवर सात टाके पडले आहेत तर डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी सकाळी जखमी परेश पाटील याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com