चारचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक, नगरसेविकेच्या मुलासह तिघे जखमी

हडसनगावाजवळ अपघात : एअरबॅगमुळे अनर्थ टळला
चारचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक, नगरसेविकेच्या मुलासह तिघे जखमी

जळगाव - Jalgaon :

चाळीसगाव येथून लग्न आटोपून कारने जळगावकडे परतत असतांना रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर चारचाकी धडकल्याची घटना आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव पाचोरा रोडवरील हडसन गावाजवळ घडली.

या अपघातात चारचाकीतील स्वप्निल चंद्रकांत पाटील वय २७, अजय गजानन देशमुख वय २७, निखिल अशोक पाटील वय २ व राहूल अशोक पाटील वय २३ सर्व रा. मुक्ताई कॉलनी, एसएमआयटी परिसर हे जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये अजय देशमुख हा महापालिकेतील नगरसेविका जयश्री देशमुख यांचा मुलगा आहे. सुदैवाने वेळीच कारची एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताई कॉलनीतील एका जणाचा चाळीसगाव येथे आज विवाह सोहळा होता. या लग्नासाठी कॉलनीतील स्वप्निल पाटील यांच्या कारने (एम.एच.१९ सी.व्ही) स्वप्निलसह अजय देशमुख , निखिल पाटील व राहूल पाटील हे चौघे जळगाव पाचोरा मार्गे गेले होते.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर चौघेही कारने पुन्हा जळगावकडे परतत होते. यादरम्यान हडसन गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिली.

अपघात इतका जोरदार होता की, यात कारचा समोरील संपूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडली. यानंतर गाडीतील स्वप्निल याने त्याच्यासोबत च्या इतरांना कारबाहेर काढले.

तसेच मोबाईलवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली तसेच अपघाताची माहिती कुटुंबियांना दिली. रुग्णवाहिकेने चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात अजय देशमुख व राहूल पाटील या दोघे गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर जखमींच्या कुटुंबियांसह कॉलनीतील रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह नगरसेवकांनीही जिल्हा रुग्णालय गाठून जखमींची भेट घेत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात कुठलीही नोंद नव्हती. उशीरापर्यंत पोलिसंाची कारवाई सुरु होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com