जळगाव - Jalgaon :

जळगावहून वाकोद कडे जात असलेल्या बोलेरोला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने या अपघातात जागीच दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उमाळा गावाजवळ घडली.

मयतामध्ये सात वर्षीय बालिकेचा समावेश आहे. नम्रता रामेश्वर चौधरी वय ७ वर्ष व डिगंबर रामराव भोसले वय ४० दोन्ही रा वाकोद ता. जामनेर अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात रामेश्वर रामदास चौधरी (३२) व अर्चना रामेश्वर चौधरी (३०, सर्व रा.वाकोद, ता.जामनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर चौधरी कामानिमित्त पत्नी अर्चना, मुलगी नम्रता व मित्र डिगंबर चौधरी असे चारचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.यु.३९१८) आले होते.

रात्री सर्व कामे आटोपल्यानंतर ९ वाजता ते वाकोद येथे जात होते. उमाळा घाटात वळणावर समोरुन येणारी मालवाहू चारचाकी (क्र.एम.एच.४१ ए.यु.१८०७) जोरदार चौधरी यांच्या गाडीवर आदळली. त्यात डिगंबर भोसले व चिमुकली नम्रता हे दोघं जागीच गतप्राण झाले.

अपघात इतका भीषण होता चारचाकीचा चुराडा झाला. भोसले हे वाहन चालक होते, मात्र आज चौधरी वाहन चालवत होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील , गणेश शिरसाळे, सचिन पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसांची कारवाई सुरू होती.