दहा हजारांची लाच घेणार्‍या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ महिलेला अंतरिम जामीन

मूळ जामीनावर निकाल होईपर्यंत अंतरिम जामीनची मुदत

जळगाव - Jalgaon :

जिल्हा रुग्णालय परिसरातील दीक्षितवाडीतील महावितरण मुख्य कार्यालयात दहा हजारांची लाच घेतांना वरिष्ठ तंत्रज्ञ शोभना दिलीप कहाने, वय-५६ रा. पवन नगर ममुराबाद रोड, जळगाव यांना काल सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

त्यांना आज मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तक्रारदार हे वृध्द असून त्यांचे घरगुती मीटर कमर्शियल करु नये तसेच दंडही करु नये असे तक्रारदाराने जोशीपेठतील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ शोभना दिलीप कहाणे यांना सांगितले.

कमर्शियल करणार नाही, तसेच दंडही न करण्याच्या या कामासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ शोभना कहाने यांनी तक्रारदार वृध्दाला १० हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी करुन पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिक्षीतवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला.

तसेच तक्रारदाराकडून दहा हजारांच्या लाचेची रक्कम घेतांना वरिष्ठ तंत्रज्ञ शोभना कहाने यांना रंगेहाथ अटक होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

दरम्यान आज मंगळवारी संशयित शोभना कहाने यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतर्फे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्या. आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात कामकाज होवून न्या. कटारिया यांनी संशयित शोभना कहाने यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. मूळ जामीनावर निकाल होईपर्यंत या अंतरिम जामीनची मुदत राहणार आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com