शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांसह शेतकर्‍यांचा फायदा

तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांसह शेतकर्‍यांचा फायदा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकर्‍यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने कृषि विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व ग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत कृषि कार्यालय आवारात तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर चौधरी, आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, ग्रोवर्ल्डचे शैलेश चव्हाण यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या काळातही बळीराजा विविध अडचणींना तोंड देऊन शेतमाल पिकवित आहे. त्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषि विभागाने यासारखे विविध उपक्रम राबवावे. जेणेकरुन ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल. या प्रकारचे महोत्सव तालुक्याच्या ठिकाणीही भरविण्याची सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.

महोत्सवाला चांगला प्रतिसाद

उपक्रम राबविण्यामागील भूमिका विशद करताना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर म्हणाले की, या महोत्सवात ग्राहकांना आवश्यक असणारे तांदूळ तसेच सांगली येथील हळद उपलब्ध आहेत. जळगावमध्ये या उपक्रमास नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

यापूर्वीही देवगड येथील हापूस आंबा, नाशिक येथील द्राक्षे, लासलगाव चा कांदा तसेच स्थानिक शेतकर्‍यांनी पिकलेला भाजीपाल व इतर पिकांच्या विक्रीलाही चागला प्रतिसाद लाभला आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना तांदूळाच्या बॅगचे वितरण करण्यात आले. आभार श्री. चव्हाण यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com