जळगाव - प्रतिनिधी jalgaon

भाजीपाला घेण्यासाठी मोटारसायकलवरून तीन सीट जात असलेल्या दुचाकीला मागून येणाऱ्या मालवाहू टेम्पोने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले तर तीसऱ्या व्यक्तीचाही उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना कृषीउत्पन्न बाजार समिती जवळ बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी श्यामलाल शहादूलाल केवट (वय-४०, रा. कैथा ता. अमिलिहा, रिवा , मध्यप्रदेश ह.मु. सिंधी कॉलनी) हे पत्नी दोन मुली व मुला सह राहतात. श्यामलाल हे शहरातील महेंद्र मकरेजा यांच्या जीत बेकरी मध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करतात. तर पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट (वय-३८) ह्या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

श्यामलाल यांचे भाऊ दिपक साधुलाल केवट हे देखील भाजीपाला विक्री करण्याचे काम करतात. भाजीपाला खरेदी करण्यासाठी दररोज ते शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ४.३० वाजता श्यामलाल केवट हे पत्नी नेवस्वा आणि भाऊ दिपक सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ७९६२) ने भाजीपाला घेण्यासाठी जात असताना

पलीकडून येणाऱ्या छोटा हत्ती या वाहनाने त्यांना धडक दिली. याचवेळी छोटा हत्ती वाहनाच्या पाठीमागे टाटा मॅजीक हे वाहन येत होते.

पुढील छोटा हत्ती या वाहनाचे अचानक ब्रेक लागल्याने मागील टाटा मॅजीक हे वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकीचालक श्यामलाल केवट व त्याच्या मागे बसलेली त्यांची पत्नी नेवस्वा केवट हे दोघे जागीच ठार झाले. तर भाऊ दिपक केवट हे गंभीर जखमी झाले. दिपक यांना तातडीन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा देखील मृत्यू झाला.