Covid 19
Covid 19
जळगाव

यावल : कोविड संशयित मृतव्यक्तीवर अंत्यसंस्कारप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

यावल - यावल तालुक्यातील कोरपावली येथील एका 72 वर्षीय वृध्दाला कोव्हिड संशयित म्हणून गोदावरी हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेत असताना मयत झाल्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. रिपोर्ट येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने मयताच्या मुलाने त्याचे घरी व व कब्रस्तानमधील सार्वजनिक जागेवर अंदाजे 100 लोकांची गर्दी करून कलम 144 चे उल्लंघन केल्याने मयताच्या मुलासहित 100 जणांविरूध्द दि. 2 रोजी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोरपावली येथील पोलीस पाटील सलीम तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. वृध्दाचा गोदावरी हॉस्पिटल नशिराबाद येथे औषध उपचार सुरू असताना दि. 29 जून रोजी ते मयत झाले होते. मयत हे कोविडी- 19 संशयित असल्याने त्यांचा मृतदेह अंत्यविधी करिता योग्य त्या अटी व शर्तीसह त्यांचा मुलाकडे दि. 30 जून 2020 रोजी प्लास्टिकमध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता सरळ कब्रस्तानमध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देऊन मृतदेह ताब्यात दिले होते.

मात्र मयताच्या मुलाने व त्यांचे नातेवाईकांनी मृतदेह कब्रस्तानमध्ये न नेता त्यांच्या घरी मयताचे मृतदेहावरील बांधलेले प्लास्टिक सोडून मयतास आंघोळ घातली होती. यावेळी मयताचा मुलासह,नातेवाईक व इतर जवळपास 100 लोक मयताच्या अंत्यविधीसाठी जमलेले होते.त्यांनी लॉकडाऊन व संचारबंदीचा नियम मोडून मयतावर दफन विधी करण्यात आला.

पोलीस पाटील यांच्या तक्रारीनुसार तसेच कोविड-19 संशयित मृत घोषित केले असल्याचे माहित असताना सुद्धा मयताचा मुलाने त्यांचे नातेवाईक व जवळपास 100 लोकांना जमवून जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे उल्लंघन केल्याने यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र. न. 61 / 2020 भा.द.वि.का. 1860 चे कलम ( 45 ) चे उल्लंघन क. 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे कलम 59 प्रमाणे मृत व्यक्तीचा मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल असलम खान हे करीत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज

जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरस संक्रमण वेगाने पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावल तालुक्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर कमी असला तरी कोरोना रूग्णांच्या संख्येत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आणि झपाट्याने वाढ होत आहे.अशा परिस्थितीत कोविड सेंटर असलेल्या नशिराबाद येथील गोदावरी हॉस्पिटल मधून कोविड संशयित वृद्ध व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का दिला गेला? मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि गोदावरी हॉस्पिटलचे संचालक यांचे राजकीय संबंध आहेत का ? कोविड संशयित शव गोदावरी हॉस्पिटल मधील कर्मचार्‍यांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिलेच कसे? याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com