लॉकडाऊनमुळे व्यापारी कसे भरणार कर्जाचे हप्ते?

डबघाईस आलेल्या व्यापार्‍यांना बिनव्याजी कर्जाची अपेक्षा
लॉकडाऊनमुळे व्यापारी कसे भरणार कर्जाचे हप्ते?

जळगाव । Jalgaon

कोरोना महामारीमुळे व्यापार, धंदा बंद असल्याने व्यापारी वर्गही मेटाकुटीस आला आहे. गेल्या 13 ते 14 महिन्यात लॉकडाऊन अन् अनलॉक प्रक्रियेमुळे व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन इतरांना विविध योजना जाहीर करुन मदत करत आहे.

मात्र व्यापार्‍यांना आतापर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही. व्यापारी बांधवांनी देशाला अडचणीच्या काळात साथ दिलेली आहे. आता, व्यापार्‍यांना बिनव्याजी कर्ज किंवा अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे. आणि कोलमडलेल्या व्यापार्‍यांना उभारी देण्याचे काम करावे. अशी भूमिका जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारीया यांनी मांडली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय गेल्या दिड महिन्यांपासून बंद आहे. तसेच गेल्या वर्ष दिड वर्षापासून लॉकडाऊन आणि अनलॉकमुळे व्यापारी डबघाईस आलेला आहे. लॉकडाऊनपुर्वी व्यापार्‍यांकडे असलेला माल तसाच पडून असल्याने त्याचे प्रचंड नुकसान होत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या जीवाचे मोल कळते. व्यापारी माणूस हा स्वयंरोजगार निर्माण करणारा असून, सरकारचा अर्धा बोजा कमी करतो. तसेच सरकारला जीएसटी, टॅक्स भरुन सरकारला वेळेवर अर्थसहाय्य करतो. सरकारकडून कोणताही मोबदला न घेता सरकारकडे वेळेवर कर भरुनही व्यापार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

लॉकडाऊनमध्ये बँका व इतर व्यवहार सुरु असल्याने गर्दी होतेय. मात्र व्यापार्‍यांकडे झालेल्या गर्दीमुळे कोरोना होतो का? असा प्रश्न उपस्थित करीत जळगाव जिल्ह्यात दहा लाख व्यापारी असून, 25 ते 30 हजार दुकाने आणि दिड हजार कुटूंबिय त्यांच्यावर अवलंबून आहे. तसेच कर्मचारी, कामगार, दुकाने बंद असूनही वीजबील व इतर खर्च यांची सांगड घालतांना व्यापार्‍यांची दमछाक होत आहे.

दुकाने बंद असल्यामुळे कर्जाचे हप्ते कसे भरणार? असा प्रश्नही भेडसावत आहे. पिढ्यानपिढ्या ग्राहक टिकवून ठेवण्याची मोठी कसरत व्यापार्‍यांना करावी लागणार आहे. एखाद्या राजकीय युनियनचे निवेदन दिले की, त्यावर सरकार विचार करुन मागणी मान्य करतो. राजकीय मेळावे, बँकांमध्ये झालेली गर्दी यांना नियम नाही का? एखाद्या दुकानदाराचे पाच मिनीट दुकान उघडे दिसले की, मनपा अधिकारी व पोलीस व्यापार्‍याला दंड करतात.

व्यापारी कायद्याला घाबरतो आणि दंड देवून टाकतो. लॉकडाऊन ही आणिबाणी नसून, ही सोशल संचारबंदी आहे. व्यापार्‍यांकडून दंड आकारला जातो या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून व्यापार्‍यांच्या भावना मांडणार आहोत. आता, कोरोनाची संख्या घटते आहे. केंद्र व राज्य सरकारने व्यापार्‍यांना व्यापार करु द्यावा. सरकारच्या नियमांचे पालन केले जाईल. असेही जळगाव दाणाबाजार, असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारीया त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com