लस घेऊनही डेल्टामध्ये कोण किती सुरक्षित?
करोना लस

लस घेऊनही डेल्टामध्ये कोण किती सुरक्षित?

डॉ. संग्राम पाटील यांनी सुचविले उपाय

नॉर्थ वेल्स North Wales (यु.के.) ।

जगभराच्या मीडिया ब्रेकिंग न्यूजमध्ये डेल्टा व्हेरियंटने Delta variant गेल्या काही महिन्यांपासून अग्रस्थान बळकावलेले आहे, त्याला कारणदेखील तसेच आहे. भारतात आता जी केरोनाची दुसरी लाट ओसरत आहे; तिला डेल्टा व्हेरियंट कारणीभूत होता. आणि जगभर ज्या तिसर्‍या-चौथ्या लाटा जगाची चिंता वाढवताहेत त्यादेखील प्रामुख्याने डेल्टामुळेच आहेत. डेल्टा पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा 70-100% जास्त प्रभावीपणे प्रसारित होतो आणि तरुणांनादेखील आजारी करतो. डेल्टाबद्दल ही एवढी एकच चिंता नाही तर डेल्टामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसींमुळे मिळणारे संरक्षणदेखील कमी झालेय, असे अहवाल जगभरातून प्रकाशित होत आहेत. आपल्याकडेही लसीचे दोन्ही डोस Both doses of the vaccine घेतलेले लोक कोरोना संक्रमित Corona infected होताना दिसताहेत.

हे असे होणे अनपेक्षित होते का? हे काही खूप घाबरून जाण्यासारखे प्रकरण आहे का? लसींचा यापुढे उपयोग होणार नाही का? लस घेणार्‍यांना किती संरक्षण मिळतेय आणि यापुढे काय महत्वाचे राहणार आहे? याबद्दल Dr. Sangram Patil यांनी व्यक्त केलेले मत सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की, सध्याचा डेल्टा व्हायरस म्युटेशनमधून अस्तित्वात येणे हे आजिबात अनपेक्षित नाही. असे असंख्य म्युटेशन व्हायरसच्या शरीरात सतत होऊन नवनवीन व्हेरियंट रोज तयार होत राहतात. यातील काहीच म्युटेशन मानवासाठी घातक ठरू शकतात. त्यातलाच डेल्टा व्हेरियंट एक आहे. या पुढेही असे व्हेरियंट येत राहणार आणि कमी-अधिक धोका निर्माण करत राहणार, यात शंका नाही. दुसरा मुद्दा म्हणजे ह्यात घाबरण्यासारखं काही आहे का? तर एकंदरीतच कोरोनाच्या पँडेमिकमध्ये असे चढ-उतार येणार, हे शास्त्रज्ञ ओळखून आहेत. पण त्यातून कोरोनाचा अनियंत्रित प्रसार होऊन आरोग्य यंत्रणांनवर जो ताण येतो आणि त्यातून जी जीवितहानी होते, हे आपल्या देशाने चांगलेच अनुभवले आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. लसीकरण जास्तीत जास्त लोकांना होणे आज खूप महत्वाचे आहे. परंतु, आपल्याकडे लसीकरण हे एकूण आकडेवारीत मोठे दिसत असले तरी टक्केवारीत खूपच अपुरे आहे (11% लोकांचे संपूर्ण लसीकरण तर अजून 30% लोकांचा एक डोस झालाय). डेल्टा व्हायरसमुळे लसींना प्रतिसाद कमी झालेला असला तरी परिस्थिती अजिबात हाताबाहेर गेलेली नाही. आज उपलब्ध असलेले व्हॅक्सिन्स डेल्टापासूनदेखील चांगलं संरक्षण करत असल्याचा अहवाल ऑक्स्फर्ड विद्यापीठाने नुकताच प्रकाशित केला आहे.

यासंदर्भात वेगवेगळ्या गटातील लोकांना डेल्टामध्ये किती प्रमाणात संरक्षण मिळते, याची सध्या उपलब्ध असलेली माहिती बघुयात. आधी हे लक्षात घ्यावं की, संक्रमण म्हणजे आजार नाही, किंवा मृत्यूच होईल असे नाही.

मुले आणि तरुणांना डेल्टा संक्रमणाचा किती धोका आहे? कोरोनाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत तरुण आणि 18 वर्षांखालील मुले हे कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटमध्ये धोक्यात आलेली नाहीत. भारतात डेल्टाच्या अत्यंत भयंकर लाटेत मुले मोठ्या संख्येने संक्रमित झाली होती. मात्र, दवाखान्यात भरती करावी लागली अशा मुलांची संख्या अगदीच नगण्य होती. या गटात मृत्यूदरदेखील नगण्य राहिला. भविष्यातही ही परिस्थिती खूप बदलेल, याची शक्यता कमीच आहे. पण तरी या वयोगटाचे लसीकरण करण्याची तयारी सरकारने करणे महत्वाचे आहे. पँडेमिक नियंत्रणासाठी ते गरजेचे आहे.

पूर्वी ज्यांना कोविड झालेला नाही आणि ज्यांनी लसही घेतलेली नाही, अशा लोकांना कोरोना रुग्णाचा जवळून संपर्क झाल्यास संक्रमणाचा धोका जास्त राहणार आहे. कारण या गटातील लोकांना नैसर्गिक संक्रमण किंवा व्हॅक्सिनची कृत्रिम इम्युनिटी यातलं काहीच मिळालेलं नसल्याने त्यांना संक्रमण सहज होऊ शकते. मात्र, पूर्वी कोविड संक्रमण झालेले असल्यास नैसर्गिक इम्युनिटी तयार होते. ह्यातून कोरोनाविरोधात चांगल्या दर्जाचे संरक्षण मिळतेय असे दिसून आलेय. एक वर्षानंतरदेखील ह्या लोकांना अँटिबॉडी आणि प्रतिकारशक्तीच्या पेशी मोठ्या प्रमाणावर राहतात. मात्र, डेल्टा व्हेरियंटच्या विरोधात संरक्षण करण्याची क्षमता 47% पर्यंत खाली येते असे नेचर या संशोधन पत्रिकेतील अहवालात म्हटले आहे. पूर्वी कोविड झालेल्या अशा लोकांना व्हॅक्सिनचा एक डोस मिळाला तरी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळते. एक डोस आणि पूर्वीचा कोविडचा आजार याने जी प्रतिकारशक्ती मिळते ती पूर्वी कोविड न झालेल्या लोकांमध्ये लसींच्या दोन डोसने मिळणार्‍या इम्युनिटीपेक्षा जास्त प्रभावी दिसून आली आहे. पूर्वी कोविड झालेल्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतल्यास सर्वोच्च इम्युनिटी मिळतेय. पूर्वी लस घेतलेल्या लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्यास रिकव्हर झाल्यानंतर हे लोक भविष्यात येणार्‍या वेगवेगळ्या व्हेरियंटच्या विरोधात जास्त प्रभावीपणे लढू शकतात. हीच गोष्ट पूर्वी कोविड झालेले लोक जेव्हा लसींचे दोन्ही डोस घेतात त्यांनाही लागू होते.

पूर्वी कोविड झालेला नसेल आणि आता लसीचा एक डोस घेतल्यास डेल्टा मध्ये केवळ 33% संरक्षण मिळते आहे. दोन्ही डोस पूर्ण केल्यास कोविशिल्डची परिणामकारकता 65% पर्यंत जाते, तर फायजरच्या लसीची 88% पर्यंत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालात लसीकरणाने किती काळ संरक्षण मिळेल, याबद्दल महत्वाची माहिती पुढे आली आहे. हा अभ्यास मुख्यत्वे फायजरच्या लसीबद्दल असला तरी त्यावरून आपल्याला सर्वसाधारण अंदाज बांधायला मदत मिळते. त्यानुसार फायजरच्या दोन डोसनंतर सहा महिन्यांत परिणामकारकता 96% वरून 84% वर आलीय. इतरही काही अभ्यासांवरून 6-8 महिन्यानंतर लसींची परिणामकारकता कमी होत जाते अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावर आधारित तिसर्‍या बुस्टर डोसचा निर्णय ब्रिटन आणि अमेरिकेत घेतला गेला. ब्रिटनमध्ये सप्टेंबरपासून अतिधोक्यात असलेल्या गटांना तिसरा डोस दिला जाणार आहे. अमेरिकेतही असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

लसीकरण झालेले लोक इतरांना व्हायरस संक्रमण करू शकतात का, याविषयी अमेरिकेतील होस्टन येथील एक प्रसंग खूप महत्वाचा आहे. येथे 94 लोकांच्या उपस्थितीत एक लग्नसमारंभ पार पडला. सगळ्या वरातींनी लसीकरण केलेले होते. यातील दोन लोक भारतातून गेलेले होते आणि त्यांना पुढे कोविड झाल्याचे लक्षात आले. त्यातील एकाचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यांच्यापासून या समारंभात इतर 4 लोकांना संक्रमण झाले. सुदैवाने हे चारही लोक कोविडमधून सुरक्षित बाहेर पडले. यावरून आणि इतर माहितीच्या आधारे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने असा निष्कर्ष काढला आहे की, लसीकरण झालेल्यांना संरक्षण मिळते पण जर त्यांना संक्रमण झालेच तर त्यांच्यापासून इतरांना धोका हा गैर-लसीकरण गटातील लोकांप्रमाणेच संभवतो. यावरून असे दिसते की, लसीकरण झाले तरी आपल्यामुळे इतरांना धोका होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com