हिंगोणे येथील सरपंच अपात्र

हिंगोणे येथील सरपंच अपात्र

जिल्हाधिकार्‍यांकडून तिघांना प्रत्येकी 10 हजारांचा दंड

राहुरी कृषी विद्यापीठाकडे वर्ग केलेली जमीन परस्पर कसण्यासाठी दिल्यामुळे हिंगोणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सत्यभामा शालीक भालेराव यांना अपात्र ठरवण्यात आले. तसेच या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी दिले. या प्रकरणात तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठवण्यात आला.

दैनिक ‘देशदूत’ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते. हिंगोणे ग्रामपंचायतीच्या ताब्यातील 20 हेक्टर जमीन 13 डिसेंबर 2015 रोजी राहुरी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विद्यापीठाची परवानगी न घेता ही जमीन उपसरपंच महेश राणे यांच्या पत्नी ज्योती राणे यांना 2 लाखांत कसण्यासाठी दिली होती. ही रक्कम गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी वापरण्यात येणार होती.

परंतु ही जमीन विनापरवानगी कसण्यासाठी दिल्यामुळे जिल्हाधिकारींनी दिलेल्या आदेशाचा अवमान झाला. ही जमीन इतर कोणत्याही प्रयोजनासाठी देण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही सरपंच व ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात यावल तहसीलदारांनी जिल्हाधिकारींकडे अहवाल सादर केला.

त्यानंतर उपविभागीय अधिकार्‍यांनीही जिल्हाधिकारींकडे अहवाल सादर केला. अखेरी 27 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारींनी सरपंच सत्यभामा भालेराव यांना अपात्र ठरवत 10 हजार रुपये दंड केला. तसेच ज्योती राणे यांना ती जमीन उभ्या पिकासह परत करण्याचे आदेश देत त्यांनाही दहा हजार रुपये दंड केला. तत्कालीन ग्रामसेवकावर महाराष्ट्र जिल्हा परिषद कायद्यानुसार कडक कारवाईचे आदेश देत त्यांनाही दहा हजार रुपये दंड केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com