हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी हिंदू राष्ट्रनिर्मितीची गरज
जळगाव

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी हिंदू राष्ट्रनिर्मितीची गरज

Balvant Gaikwad

सेक्युलरवाद्यांनी हिंदू राष्ट्राविषयी अनाठायी भीती निर्माण केली. न्याय, समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे हिंदू राष्ट्रच सर्व कल्याणकारी असेल. हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी व त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, म्हणून हिंदूराष्ट्र निर्मितीची गरज आहे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.

हिंदू जनजागृती समिती आणि हिंदूत्त्ववादी संघटनांतर्फे रविवारी सायंकाळी शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय प्रवक्ते ईश्वरप्रसाद खंडेलवाल, हिंदू विधीतज्ज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

सेल्युलरवादाच्या नावाखाली हुकुमशाही

रमेश शिंदे पुढे म्हणाले की, भारताला इस्लामिक राष्ट्र करण्यासाठी सुरू असलेल्या लव्ह जिहाद, लँड जिहाद यांची सर्वांना माहिती आहे. आता मात्र भारताला आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्यासाठी ‘हलाल जिहाद’ हे नवीन षडयंत्र सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका पोचवण्याचा प्रयत्न होत आहे. 14 टक्के अल्पसंख्यांकांची उर्वरित 85 टक्के हिंदू समाजावर सेल्युलरवादाच्या नावाखाली एकप्रकारे हुकुमशाही सुरू आहे, असा आरोप शिंदे यांंनी केला.

कमकुवतचे षडयंत्र

लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले की, सद्यस्थितीत देशाच चालू असलेले गृहयुद्ध हे साधारण नाही, तर विदेशी शक्तीच्या पैशांच्या जोरांवर राष्ट्रविरोधी शक्तींचे भारताला कमकुवत करण्याचे सुनियोजित षडयंंत्र आहे. दिल्लीच नाही, तर भारताच्या अन्य राज्यांतही अशांती निर्माण करण्याचे काहींचे षडयंत्र आहे. हिंदू राष्ट्राच्या आंदोलनाला गती प्राप्त करुन द्यायला हवी. तरच भारतात सर्व जण शांततेने राहू शकतील. तरच भारत विश्वगुरु होऊ शकेल, असे मत खंडेलवाल यांनी व्यक्त केले. तसेच देशाला सन 2023 मध्ये हिंदूराष्ट्र घोषीत करण्यात येईलच, त्यासाठी राष्ट्रकार्य व त्यागाची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले.

धर्माचे आचरण करा

सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव म्हणाले की, केवळ हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे, हे संकुचित ध्येय न ठेवता अखिल विश्व सुसंस्कृत करू, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा आहे. ही घोषणा सार्थ करण्याचे धर्मकर्तव्य आपण सर्व जण पार पाडू. यासाठी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा, असे जाधव यांनी सांगितले.

हिंदूंना दुय्यम स्थान

हिंदू विधीतज्ज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले की, देशात अल्पसंख्य संघटित असून, त्यांच्याकडून हिंदूंवर अन्याय होत आहेत. त्यांच्या संघटनाच्या प्रभावामुळे राजकीय शक्तीही अन्यायग्रस्त हिंदूंची बाजू ऐकून घेत नाही. बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे. अन्यायग्रस्त हिंदूंवरच कारवाई करुन आजची ‘धर्मनिरपेक्षता’ पाळली जाते. अशा वेळी कायद्याचा गैरवापर केला जातो. यामुळेच हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना न्याय मिळवून देण्याकरिता कायद्याची योग्य ती माहिती आणि वापर आवश्यक आहे, असेही खंडेलवाल म्हणाले.
सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. राहुल चौधरी यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा, सत्यब्रह्म संस्थेचे संचालक किरण महाजन यांनी ईश्वरप्रसाद खंडेलवार यांचा, जळगाव बार असोसिएशनचे अ‍ॅड. प्रभाकर पाटील यांनी अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा, तर चिंचोली येथील किरण घोगे यांनी रमेश शिंदे यांचा सत्कार केला.

स्वरक्षणाचे प्रात्यक्षिक

क्षिप्रा जुवेकर यांनी हिंदू जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता यापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करुन दाखवली. हे प्रात्यक्षिक अमोल वानखेडे व त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केले. सूत्रसंचालन रागेश्री देशपांडे यांनी केले. या वेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com