कोरोना रुग्णांना सेवादूत "वाल्मिक"चा मदतीचा हात!

हिरापुरातील गरजवंतांच्या मदतीसाठी तत्पर, नागरिकांमध्ये जनजागृती
कोरोना रुग्णांना सेवादूत "वाल्मिक"चा मदतीचा हात!

डॉ.महेंद्र सांगळे

शेळावे ता.पारोळा Parola

दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आधी शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता शेवटच्या तांडा, वस्ती व गावांपर्यंत पोहचला आहे. अशा भयावह परिस्थितीत अनेकांनी अलिप्त व घरातच थांबणे पसंत केले असले तरी काही कार्यतत्पर व्यक्ती गरजवंतांना मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. हिरापुर ता.पारोळा येथिल नवनिर्वाचित सरपंच नेहा पाटील यांचे पती वाल्मिक पाटील उर्फ बंटी भाऊ गरजवंतांसाठी सेवादूत म्हणून भूमिका निभावत आहेत.

यावर्षी गावात कोरोना बाधित अनेक रुग्ण दिसुन येतांना काही मंडळी घाबरून व गैरसमजुतीने आजार लपवतांना दिसतात. त्यामुळे वाल्मिक पाटील दिवस रात्र गावात फिरून संपर्क ठेवुन यावर लक्ष ठेवुन आहेत. कोरोना सदृश व्यक्तींची कोणती टेस्ट करावी, कोणता उपचार घ्यावा, खूप खर्च येईल अशी मानसिकता निर्माण झालेली असते.

या लोकांना भेटुन त्यांना योग्य सल्ला देवुन वेळप्रसंगी त्यांना जास्तीत जास्त सरकारी रुग्णालयात उपचार करणे किंवा कमी खर्चात इतरत्रही कसा उपचार होईल यासाठी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना समजविण्याचे, स्वतः त्यांच्या सोबत जावुन टेस्ट करायला लावणे, गरज असल्यास सहकारी व जास्त त्रास असेल तर खाजगी दवाखान्यात दाखल करणे, रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास ओळखीच्या डॉक्टरांशी व संबंधित माध्यमांशी संपर्क साधुन ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्याचे कार्य ते दीड दोन महिन्यापासून अविरत करीत असून गावात रुग्ण आढळुन आल्यापासुन त्याला स्वतःच्या गाडीने दवाखान्यात नेणे, टेस्ट करणे, दवाखान्यात दाखल करणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे व गरज पडल्यावर रुग्णांना घरून जेवणाचे डबे तयार करून पोहचविणे असा आटापिटा ते करीत आहेत. वाल्मिक पाटील यांचे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील सेवादूत म्हणुन स्तुत्य कार्य कौतुकास्पद व आदर्श निर्माण करणारे ठरत आहे.

माझ्या जवळच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याने मी स्वतः १३ दिवस रुग्णालयाच्या प्रत्यक्ष संपर्कात होतो. त्यावेळी सर्व परिस्थिती जवळुन बघितली. त्यानंतर माझ्याच गावात कोरोना रुग्ण आढळुन येवु लागले. भीतीचे वातावरण तयार झाले. मग यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. कोरोना बाधितांना योग्य उपचार, त्यांची लुटमार होवु नये, नवीन रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोहचावे यासाठी कार्यरत आहे. डॉक्टर व इतर अनेक मान्यवरांशी चांगले संबंध कामास येवुन सहकार्य मिळत आहे.
- वाल्मिक पाटील, हिरापुर, ता.पारोळा
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com