मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

केळीसह वृक्ष व घरांची पडझड : नायब तहसिलदारांच्या पथकाने केली पाहणी
मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

मुक्ताईनगर । वार्ताहर

तालुक्यात आज दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने नायगाव , उचंदा व दुई सुकळी परिसरात केळी पिकासह वृक्ष व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. विजेच्या तारा तुटून खांबही कोलमडून पडले. इतकेच नाही तर बैल जोडीवर वृक्ष पडल्याने बैलजोडी गंभीर जखमी झाली आहे दरम्यान आमदारांच्या सूचनेनुसार आज नायब तहसीलदारांच्या पथकासह शिवसेना पदाधिकार्‍यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यात शेकडो एकर केळीची बागायती चे नुकसान झाल्याचा अंदाज असून उद्या पंचनामा करण्यात येणार आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे परिसरातील पूरनाड, उचंदा, शेमळदा, मुंढोळदे, मेळसांगवे, पंचाणे दुई, सुकळी तसेच नायगाव, बेलसवाडी, कर्की परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे केळी पिकाचे व प्राण्यांची जीवित हानी झाली. मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना कळली. परंतु ते मुंबई असल्याने त्यांनी रावेर, मुक्ताईनगर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

तसेच उचंदा गणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी सुुुचनेनुसार नायब तहसिलदार प्रदीप झांबरे, कृषि सहाय्यक संदीप पाटील व विनोद पाटील, तलाठी गणेश मराठे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे आदी पदाधिकार्‍यांनी नुकसानीची पाहणी केली.

परिसरात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर व इतर पिकांचे तसेच गाव परिसरात झाडे तुटणे यामुळे घरांची पडझड , विजेच्या खांबांची, तारांची तसेच असंख्य ठिकाणच्या रोहित्राची (डी. पी.) प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच सुदैवाने जीवित हानी टळली असून उचंदे गावात एका शेतकर्‍यांची बैल जोडी मात्र गंभीर जखमी झाली आहे. तर मुंढोळदे येथे संजय कडू भालेराव यांच्यासह अनेकांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. दरम्यान पाहणी दौर्‍यावरील पथकाने या संदर्भातील माहिती आमदार पाटील यांच्यासह तहसीलदार संचेती यांना दिली आहे.

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने हे पीक जोपासले आहे. यावर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळेल, या आशेने वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना आज 27 मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक वादळाने प्रचंड थैमान घातले. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या प्रलयंकारी वादळी वार्‍याने व मुसलधार पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.

आ.चंद्रकांत पाटील यांचा प्रशासनाशी संवाद -

दरम्यान, याबाबतची माहिती आ. चंद्रकांत पाटील यांना कळताच त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील व रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना भ्रमध्वनिवरून संवाद साधला. आणि नुकसानीची माहिती घेतली. तसेच रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे मुक्ताईनगरच्या तहसिलदार श्वेता संचेती यांना तसेच रावेर व मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत शुक्रवार सकाळपासून केळी पिकासह इतर पिके तसेच घरांची पडझड याबाबत सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

शेतकर्‍यांच्या माथी दुष्काळात तेरावा महिना

शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने केळी पिकाची लागवड केली होती. केळीला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी वर्ग आनंदात होते. परंतु, व्यापार्‍यांकडून लॉकडाऊनचे कारण दाखवत अडवणूक करून कमी भावात मागणी करण्यात येत होती. त्यातच आज झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे आता शेतकर्‍यांच्या माथी दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.

तारा तुटून वीज खांब वाकले

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतशिवार व गावठाणच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकून तारा तुटल्या तसेच रोहित्र ही कोलमडून पडलेले असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त भाग अंधारात राहणार आहे.

पंचनाम्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव । जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत. आ. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून दिली तसेच याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचीही मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिलेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com