हॉकर्स, विक्रेत्यांनी तोडले प्रवेशद्वार
जळगाव

हॉकर्स, विक्रेत्यांनी तोडले प्रवेशद्वार

अतिक्रमण पथकाची अचानक एन्ट्री , फुले मार्केटमध्ये उडाली दाणादाण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

फुले मार्केटमध्ये मनपाच्या अतिक्रमण पथकाने अचानपणे दोन प्रवेशद्वारामधून एन्ट्री केल्याने दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास फूटपाथवरील व बाहेर रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्केटचे काही ठिकाणी गेट बंद केलेले असल्यामुळे या धावपळीत हॉकर्स, फूटपाथ विक्रेेतेंकडून गेटची मोडतोड झाली.

गेल्या तीन दिवसापासून फूटपाथवरील व बाहेर रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानदारांना चांगलीच संधी मिळून आली होती. येथे दोन दिवसापासून तर यात्रेचे स्वरुप होते. अतिक्रमण पथकाने अचानपणे दोन प्रवेशद्वारामधून एन्ट्री केल्याने संपूर्ण फुले मार्केटमध्ये हॉकर्स, फूटपाथवाल्यांसह खरेदीदारांची चांगलीच धावपळ उडाली होती.

जो तो आपले गाठोडे, साहित्य घेवून इकडे तिकडे पळत होता. दुसरीकडे मात्र अधिकृत दुकानदार हे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे चित्रच सध्याही दिसून येत आहे. अधिकृत दुकानदार हे आपले दुकान उघडून केवळ हात बांधून उभे आहेत त्यांना व्यवहार करण्यास मर्यादा आणलेली आहे. फुले मार्केटसह गोलाणी मार्केटमध्ये सर्वच मोबाईल दुकाने खुली केलेली होती व रोखीने व्यवहार होत असल्याचेही दोन्ही मार्केटमध्ये दिसून आले. काही दुकानदार, व्यापार्‍यांनी गैरफायदा घेत परवानगी नसतांना दुकाने उघडी ठेवली होती. नागरिकांचीही ठिकठिकाणी गर्दी झालेली निदर्शनास आली.

ऑनलाईन व्यवहार ठप्पच

एक दोन दुकानदार वगळता बहुतेक दुकानदार दुपारी 12 ते 4 या वेळेत ऑनलाईन, होमडीलीव्हरीच्याच आदेशानुसार काम करीत आहेत. मात्र ऑनलाईनसाठी ग्राहकच मिळेनासे झाले आहेत. एकदोन ग्राहक वगळता कुणीही ऑनलाईन अथवा होमडिलीव्हरीसाठी तयार होत नसल्याचे फुले मार्केट व्यापार्‍यांनी सांगितले. रोखीचे खरेदीदार परतवून लावत आहेत याबाबत दुकानदारांकडे फेरफटका मारला असता अधिकृत दुकानदारांकडून रोखीने खरेदी केले जात नसल्याचे दिसून आले.

फुले मार्केटला यात्रेचे स्वरुप

गेल्या तीन दिवसापासून फुले मार्केटमध्ये फूटपाथवरील विक्रेते, हॉकर्स यांचे पूर्वीसारखेच व्ववहार दिवसभर सुरू होते. यामुळे लॉकडाउन संपले की काय? मनपाने शिथिलता दिली की काय किंवा काही शिथिलतेबाबत काही नवीन आदेश निघाले की काय अशी चर्चा या परिसरात होती. मार्केटला पूर्वीसारखे यात्रेचे स्वरुप असल्याने अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत माहिती घेतली असता गेल्या 4 महिन्यापासून शहरातील सर्वच व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली होती. अतिक्रमण धारक, फुटपाथवाले यांचीही दुकानदारी बंद होती. तेव्हापासून दुकानदार, व्यवसायिक या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अशा सर्वांचेच जगणे कठीण झाले होते. कर्मचार्‍याचा रोजगार बुडत होता, दुकानदारांचा व्यवसाय बुडत होता. मोठे नुकसान व्यावसायिक, दुकानदार, हॉकर्स, फुटपाथ विक्रेते यांना सोसावे लागले याचाच परिणाम म्हणून स्वत:च्या जबाबदारीवर ही दुकाने उघडी होती असे दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com