जळगाव । प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनीत कंवरनगर आणि तांबापूर परिसरात बेकायदेशीर गुटखा व सुगंधीत पान मसाला विक्री करणार्या एकाच मालकाच्या दोन दुकान व घर अशा तीन ठिकाणी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला.

या कारवाईत 2 लाख 98 हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून एक फरार झाला. दरम्यान कारवाई करतेवेळी मालकीन महिलेने पथकाची चांगलाच वाद घातला. वादाला न जुमानता थेट कुलूप तोडून पोलीस उपअधीक्षकांनी कारवाई करत हा माल जप्त केला.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर आणि तांबापुर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुगंधित पान मसाल्याची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून तीन पथक तयार केले.

तीनही पथकाने दुपारी 12.30 ते 4.30 वाजेदरम्यान शहरातील रमेश जेठानंद चेतवाणी रा. सिंधी कॉलनी यांच्या मालकीच्या खुशी ट्रेडर्स नावाच्या दोन दुकानांवर आणि राहत्या घरात तीन्ही पथकांनी अचानक छापा टाकला व 2 लाख 98 हजार 636 रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत पान मसाल्याचा माल जप्त केला. ही तिन्ही दुकाने एकाच मालकिचे असून याप्रकरणी दुकानमालक रमेश जेठानंद चेतवाणी आणि शारदा रमेश चेतवाणी रा. सिंधी कॉलनी या पती-पत्नी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून मुलगा दिपक रमेश चेतवाणी हा फरार झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार तुकाराम निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेले आरडाओरड करत घातला वाद

पोलीस उपविभागीय कार्यालयातील रविंद्र मोतीराया, प्रकाश कोकाटे, निलेश पाटील, कैलास सोनवणे, विजय काळे, उषा तिवाणे, वैशाली सोनवणे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, सुनिल सोनार, मिलींद सोनवणे., सुधीर सावळे, सचिन पाटील, सपना येरगुंटला, जयश्री बाविस्कर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाई करतेवेळी शारदा चेतवानी या महिलेने कारवाई टाळण्यासाठी चांगलाच वाद घातला. मोठ मोठ्यान आरडाओरड करत कर्मचार्यांशी अरेराव करीत गोंधळ घातला. मात्र तिच्या वादाला न जुमानता पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी ही कारवाई केली.