जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग.स. सोसायटीच्या लोकसहकार व सहकार गटातील 14 संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे गुरुवारी राजीनामा दिला होता.

त्यानंतर दोनच दिवसात ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होऊन आठ संचालकांनी सर्वानुमताने लोकसहकार गटाची सूत्रे शामकांत भदाणे यांच्याकडे सोपविली आहे.

दरम्यान, ग.स.त पुन्हा एकदा नवीन गटाचा उदय? या आशयाखाली दै.‘देशदूत’ने 30 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. देशदूतने वर्तविलेले भाकित शनिवारी खरे ठरले.

लोकसहकार गटाचे तत्कालीन अध्यक्ष विलासराव नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, व्हा.चेअरमन सुनील पाटील यांच्यासह पाच तर सहकार गटातील गटनेते उदय पाटील, अजबसिंग पाटील यांच्यासह 9 अशा दोन्ही गटातील 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

तसेच राजीनामानाट्यानंतर 14 संचालकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचे रहस्य गुलदस्त्यात आहे. शनिवारी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या उपस्थितीत आठ संचालकांची बैठक घेण्यात आली.

लोकसहकार गटातील पाच संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे उर्वरित आठ संचालकांनी या गटाचे कामकाज पुढे सुरु ठेवावे व ध्येयधोरणे ठरवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

गट चालविण्यासाठी अध्यक्षपदाची निवड करावी, असे सर्व आठ संचालकांचे चर्चेअंती ठरविण्यात आले. ग.स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक शामकांत भदाणे यांची सर्वानुमते निवड करुन लोकसहकार गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपविली आहे. यावेळी ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, शामकांत भदाणे, सुभाष जाधव, नथ्यू पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल गायकवाड, दिलीप चांगरे आदी उपस्थित होते.

सभासदांना न्याय देणार

लोकसहकार गटाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आहे. ग.स.संस्था आणि सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून या पदाला न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित लोकसहकार गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.