जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या दि. 15 रोजी मतदान होणार आहे. एकूण 783 ग्रामपंचायतींपैकी 92 ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत.

त्यामुळे उर्वरीत 687 ग्रा.पं.मध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

त्यासाठी तालुकास्तरावरून मतदान साहित्य जिल्हयातील 2415 मतदान केंद्रांवर तालुकास्तरावरून रवाना करण्यात आले. या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्रामपातळीवर 13हजार 247 उमेदवारांसाठी 13लाख, 4 हजार, 923 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात 687 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज ग्रामीण स्तरावर मतदान प्रकिया पार पाडली जाणार आहे. जिल्हयात 7213 सदस्यांसाठी निवडणूक मतदान घेण्यात येत आहे. यापैकी माघारींअंती 2003 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. तर 5135 सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

पाचोरा तालुक्यात सर्वाधिक 295 मतदान केंद्र

जिल्हयात 2415 मतदान केेंद्र तयार करण्यात आले असून यात जळगाव तालुक्यात 43 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्र आहेत. पाचोरा तालुक्यात सर्वात जास्त 96 तर सर्वात कमी 26 ग्रामपंचायतींची संख्या भुसावळ तालुक्यात आहे. सर्वात जास्त 295 मतदान केंद्र पाचोरा तालुक्यात तर 80 सर्वात कमी बोदवड तालुक्यात आहेत.

पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून या निवडणूका निर्भयपणे व तणावमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी जिल्ह्यात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त गुरुवारी सकाळीच रवाना करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी एसआरपीचे पाच प्लाटून व धुळे, नंदूरबार येथूनही बंदोबस्तासाठी पोलीस मागविण्यात आले आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवारांना कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांमार्फत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.मतमोजणीलाही हाच बंदोबस्त कायम राहणार आहे.

अवैध मद्य विक्रीवर नजर

ग्रा.पं. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अवैध मद्य विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

करोना बाधीतांसाठी अर्धा तास राखीव

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कायम आहे. दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढू लागली आहे. होम कॉरंटाईन तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधीत मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार शेवटाचा अर्धा तास राखीव ठेवला आहे.