जळगाव - Jalgaon :

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यासाठी आज अंतिम मुदत असून ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज सादर करण्याची राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे.

बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी ऑनलाइन द्वारे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. परंतु ऑनलाइन द्वारा अर्ज सादर करण्यात इंटरनेट ची गती कमी असल्याने अनेकांना अर्ज दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या.

याची तक्रार तालुकास्तरावर करण्यात आली होती. याची दखल घेत बुधवार 30 रोजी दुपारी तीन वाजेच्या मुदती ऐवजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने देखील नामांकन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मंगळवार रोजी जिल्हाभरातील 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजारांच्या वर अर्ज दाखल झाले आहेत. जळगाव तालुक्यातून 656 नामांकन अर्ज दाखल झाले असून 1900 अर्ज इतर 14 तालुका स्तरावरून दाखल करण्यात आले आहेत. बऱ्याच ठिकाणी इंटरनेटचा वेग कमी असल्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्यास इच्छुक उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत 70 नामांकन अर्ज दाखल झाले होते. सलग तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्या नंतर सोमवार 28 रोजी अकराशे त्रेचाळीस व मंगळवार 29 रोजी सुमारे दोन हजार पाचशेच्या वर असे एकूण 3700 नामांकन अर्ज निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून दाखल करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज बुधवार रोजी 5:30 वाजेपर्यंत अंतिम मुदत संपुष्टात येत असून बहुतांश उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र समिती कार्यालयाकडे देखील 5 हजारांच्यावर अर्ज दाखल केल्याने अंतिम मुदती अखेर मोठ्या प्रमाणावर नामांकन अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याचे तालुका स्तरावरून बोलले जात आहे.