उत्तम वर्तन असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा

विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सल्ला
उत्तम वर्तन असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या स्नातकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन करण्याचा प्रयत्न जरूर करावा, मात्र त्या आधी उत्तम वर्तण असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा किंबहूना उत्तम मनुष्यत्व हिच प्राथमिकता असायला हवी असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात स्नातकांना उद्देशून दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एकोणतिसावा दीक्षांत समारंभ सोमवारी ऑनलाईनद्वारे पार पडला.

यावेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षस्थानावरून दीक्षांत भाषण केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रभारी कुलगुरु, प्रा.ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणूकीने सभागृहात कुलगुरु व अधिष्ठातांचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन सहायक कुलसचिव, रामनाथ उगले मिरवणूकीच्या अग्रभागी होते.

दीक्षांत मिरवणूकीत प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरु, प्रभारी कुलसचिव संचालक, परीक्षा व मूल्यामापन मंडळ व चार अधिष्ठाते हे सहभागी होते. प्रारंभी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी मागितली.

विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान केल्या.

अधिष्ठातांमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य आर.एस.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य पी.पी.छाजेड, मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ.पी.एम.पवार, आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. ए.आर.राणे यांचा समावेश होता. सुर्वण पदक प्राप्त 99 विद्यार्थ्यांपैकी तीन सुवर्णपदक धारक विद्यार्थ्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी नावे घोषीत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले.

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणले की, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. या शिकवणीचा अंगिकार आपण करायला हवा. बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे. निरक्षर असून ही बहिणाबाईंनी जगण्याचे मोठे तत्वज्ञान सांगीतले आहे असे सांगताना श्री. कोश्यारी यांनी बहिणाबाईंच्या अरे संसार संसार या कवितेचे उदाहरण दिले.

28 हजार 98 स्नातकांना पदव्या बहाल

या समारंभाला व्यवस्थान परिषद सदस्य, अधिसभा सदस्य व विद्यापरिषद सदस्य दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात 28 हजार 98 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या.

यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 16 हजार 358 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 5 हजार 189 स्नातक, मानव्य विद्याशाखेचे 5 हजार 35 आणि आंतर विद्याशाखेचे 1 हजार 79 स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये 261 पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक.चे 437 विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आल्या.

शिक्षणासह साहित्य परंपरा जोपासणारे विद्यापीठ

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणालेे की, शिक्षणापासून साहित्या पर्यंतची परंपरा या विद्यापीठाने जपली असल्या बद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेणारे हे पहिले विद्यापीठ आहे. त्याचे अनुकरण राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ही केले जाईल. प्रत्येक विद्यापीठात असे साहित्य संमेलन घेऊन पुढे एकत्रित साहित्य महोत्सव घेऊन राज्याची साहित्य व संस्कृती जोपासली जाईल असे त्यांनी सांगीतले.

कमवा आणि शिका योजना जळगाव विद्यापीठात प्रभावीपणे राबविली जाते तशी ती इतर विद्यापीठांमध्ये प्रभावीपणे राबविली जाईल असे सांगून श्री. सामंत यांनी जळगाव विद्यापीठातील तक्रार निवारण केंद्राचे मोड्युल इतर विद्यापीठांमध्ये ही राबविले जाईल.

हे केवळ तक्रार निवारण केंद्र न राहता तक्रार व शंका निरसन केंद्र व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरच सर्व विद्यापीठांमध्ये तंबाखु मुक्त आणि छेडछाड मुक्त कॅम्पस अभियान शासनाकडून राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com