जळगाव - Jalgaon

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, जळगावतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यमान सरकारला एक वर्ष पूर्ण ल्याच्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात या सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय त्याचबरोबर ‘कसम आणि कोविड-19 आजाराबाबत’ कोरोना काळात शासनाने केलेल्या कामांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अतंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्यावतीने लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

लोककला आणि पथनाट्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.पाटील यांनी यावेळी केले.

लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्या-या जळगाव जिल्ह्यातील सात संस्थांचा शासनाच्या यादीत समावेश आहे. या संस्थांमार्फत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील बाजारपेठेच्या व मोठ्या 126 गावांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची 26 जानेवारीपर्यंत प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. दिशा समाज प्रबोधन बहुद्देशिय संस्थेच्या कलाकारांनी यावेळी लोककला सादर केली.