वाळू माफियांनी ‘गिरणाई’ला ओरबडले !

नदीपात्रात जाण्यासाठी तयार केल्या चोरवाटा; प्रशासनासमोर आव्हान
वाळू माफियांनी ‘गिरणाई’ला ओरबडले !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील गिरणा नदीच्या वाळूला सोन्यापेक्षा अधिक भाव असल्याने राज्यभरातून या वाळूला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे वाळू माफियांकडून दिवसासह रात्रभर नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करीत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून वाळूमाफियांनीच गिरणाईला ओरबाडलयचे चित्र दिसून येत आहे.

राज्यासह जिल्हा प्रशासनाला वाळू माफिया डोकेदुखी ठरत आहे. जिल्हाभरातील नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याने कोट्यावधी रुपयांचा प्रशासनाला महसूल बुडत आहे. प्रशासनाकडून कारवाईसाठी अनेक भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

परंतू वाळू माफियांकडून या पथकांवर देखील जीवघेणे हल्ले केले जात असल्याने पथके देखील कारवाईसाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. यातच शहरालगत असलेल्या गिरणा नदीची वाळू ही बांधकामासाठी अतिशय दर्जेदार असल्याने नाशिक, पुणे, मुंबई याठिकाणाहून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

त्यामुळे पाहिजे तितका दाम मिळत असल्याने वाळू माफियांकडून गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणाहून वाळूची चोरी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला वाळू चोरी रोखणे एक आव्हान कायम राहिले आहे.

बेसुमार वाळूचा उपसा

गिरणा नदीपात्रातून दिवसरात्र बेसुमार वाळूचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच बांभोरी व शहराला जोडणार्‍या पुलाजावळ देखील वाळू माफियांंनी वाळूचा उपसा केल्यामुळे याठिकाणी पुलाच्या खाबांजवळ देखील मोठे खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे पुलाला त्याचा धोका संभावून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बेसुमार वाळू उपसामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांना डंपरचा नाहक त्रास सहन करवा लागत आहे. अनेक वाळू माफियांनी नदीपात्रात जाण्यासाठी चक्क वाळू व मातीचा वापर करुन रस्ता तयार केला आहे. यामुळे पावसाळ्यात नदीला पुर आल्यास त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या शेतात पाणी जात असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड नुकसान होत आहे. नदीपात्रातून होणार बेसुमार वाळू उपसा थांबविण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यक आहे.

झाडाझुडपातून चोर वाटा

वाळू चोरी करण्यासाठी वाळू माफियांकडून अनेक शक्कल लढविल्या जात असतात. यामध्ये अनेक वाळू माफियांनी गिरणा नदीपात्राजवळील आव्हाणे, कानळदा, बांभोरी या गावांजवळून झाडाझुडपांतून अनेक चोर वाटा तयार करण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी आलेले पथकाची कुणकूण लागताच वाळू माफिये या चोर वाटांद्वारे पळ काढत असल्याने पथकाला रिकाम्या हाती परतावे लागते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com