जिल्ह्यास पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळणार

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यमंत्र्यांकडून तत्परता
जिल्ह्यास पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपकरणे मिळणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमुळे जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना लाभ होणार आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून ऑक्सिजनचा साठा उपलब्ध केला असला तरी दररोज याची मागणी वाढतच आहे.

या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे उपाययोजनांची मागणी केली होती. याअनुषंगाने ना. टोपे यांनी ना.पाटील यांना पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपकरणांची तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे.

ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची मागणी केली होती.

या आवाहनाला सिंगापूर येथील टेमासेक फाऊंडेशनने प्रतिसाद देत तातडीने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपकरणे उपलब्ध केली असून याचे राज्यात ठिकठिकाणी वाटप करण्यात येत आहे.

यातून जळगाव जिल्ह्यासाठी पाच उपकरणे देण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून ही पाचही ऑक्सिजन उपकरणे जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्याच्या आरोग्य विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी दिलेल्या पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपकरणांचा तातडीने आवश्यकतेनुसार वापर करण्यात येणार आहे. या उपकरणांचा जिल्ह्यातील रूग्णांना लाभ होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com