प्रेरणा शिबिरासाठी 75 विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी विचार, संस्कार परीक्षेचे आयोजन
प्रेरणा शिबिरासाठी 75 विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावतर्फे इयता 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा हे राज्य स्तरीय शिबीर आयोजण्यात आले आहे. या शिबिरास आज पासून सुरवात झाली.

गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दरवर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन केले जाते या परीक्षेत सहभाग घेण्या-या विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर आहे. संपूर्ण राज्यातून एकुण 300 विद्यार्थ्यांमधून केवळ 75 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 25 ते 28 मे या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने हे शिबीर होत आहे.

गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अयंगार यांनी प्रयोगशील मोहन या विषयावर मार्गदर्शन करून शिबिरास सुरवात झाली. महात्मा गांधी यांनी आपल्या विद्यार्थी जीवनात केलेल्या चूका, त्या चुकांची त्यानी दिलेली प्रामाणिक कबुली व त्यासाठी त्यांनी घेतलेले प्रायश्चित्त हा विषय डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी रंजक पद्धतीने मांडला.

त्यात विद्यार्थांना त्यांनी आवाहन केले की तुमच्या आयुष्यात अशा चुका झाल्या असतील व त्या तुम्ही कोणाला सांगितल्या नसतील तर त्या आता सांगा त्यामुळे तुमच्याही मनावरचे दडपण कमी होईल. ज्यांच्या सोबत चुकीचे वागले असाल त्याची माफ़ी मागा, या मुळे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडून झालेल्या चूका मान्य केल्या व त्यातून एक नवीन धडा घेतला.

तीन दिवसीय शिबिरात विविध उपक्रम

शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुढच्या तीन दिवस चालणार्‍या या शिबिरात विविध विषयावर व्याख्यान, चर्चा खेळ, मनोरंजन, चित्रफित आदि विषयाद्वारा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी देखील अशा प्रकारची शिबिरे आयोजली जाणार आहेत असे गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे कळविण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com