फ्लॅट भाड्याने घेण्याच्या आमिषाने डॉक्टरला गंडा

सैन्यात नोकरीला असल्याचे भासवून केली 73 हजारांची फसवणूक
फ्लॅट भाड्याने घेण्याच्या आमिषाने डॉक्टरला गंडा

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विजय कॉलनी येथे डॉक्टरला त्याचा पुण्यातील फ्लॅट भाडे करारावर घ्यावयाचा असल्याचे सांगत पैशांसाठी क्युआरकोड स्कॅन करायला लावून 73 हजार 500 रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना 19 मे रोजी समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधितांनी सैन्य दलात नोकरीला असून त्याबाबतचे पुरावे दाखवून विश्वास संपादन करुन ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी आज रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सैन्य दलातील कॅन्टींगचे कार्डही पाठविले

शहरातील विजय कॉलनी येथे मुरलीधर रामचंद्र झोपे हे वास्तव्यास आहेत. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. झोपे यांचा पुण्यात फ्लॅट असून तो त्यांना भाडेकरारावर द्यावयाचा असल्याने त्यांनी जॅक्रेस कॉम या संकेतस्थळावर जाहीरात दिली होती. या जाहीरातीनुसार 19 मे रोजी दुपारी झोपे यांना एकाचा फोन आला. त्याने रणदिपसिंग असे नाव सांगून जम्मू काश्मिरमधील रहिवासी आहे. तसेच सैन्य दलात नाईक पदावर नोकरीला असून सद्यस्थितीत ग्वाल्हेर येथे असल्याचे सांगितले. तसेच माझी आता पुणे भोसरील येथे सैन्य दलात बदली झाली असून तुमचा फ्लॅट भाड्याने घ्यावयाचा असल्याने त्यासाठी संपर्क साधल्याचे सांगितले. त्यानुसार झोपे यांनी त्याला दरमहा भाडे व डिपॉझिट रक्कम याबाबत माहिती दिली. संबंधिताने त्याचे पॅनकार्ड व आधारकार्ड सतेच सैन्यदलातील कॅन्टींग कार्ड झोपे यांना पाठवून विश्वास संपादन केला.

क्यूआरकोेड स्कॅन करायला सांगून गंडविले

काही वेळाने संबंधिताने झोपे यांना डिपॉझिट जमा करण्याचे सांगत गुगल पे, पेटीएम ला लिंग असलेला मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. लेखा विभागातील अधिकारी असल्याचे सांगत संबंधिताने राहूल कुमार याच्याशी ओळख करुन दिली. व तो पैसे देणार असल्याचे सांगितले. राहूल कुमार नावाच्या व्यक्तीने झोपे यांना क्युआरकोड पाठविला व तो स्कॅन करा असे सांगून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. झोपे यांनी तीन वेळा क्युआर कोड स्कॅन केला.

यादरम्यान त्यांच्या खात्यावर पैसे आले नाही, उलट त्यांच्या खात्यातून तीन वेळा प्रत्येकी 24 हजार 500 याप्रमाणे 73 हजार 500 रुपये राहूल नामक व्यक्तीच्या खात्यावर जमा झाले. यानंतर संबंधिताने अजून दुसर्‍या खात्याला पेटीएम क्रमांक द्या असे सांगत परत करण्याचे आमिष दिले. झोपे यांंना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन आज रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसणुकीदरम्यान फोनवर बोलणार्‍या रणदिपसिंग व राहूल कुमार या नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास शेंडे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com