मदतीचा हात : यावल तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जमा केला चार लाख निधी

ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईनसाठी होईल मदत
मदतीचा हात : यावल तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जमा केला चार लाख निधी

यावल - प्रतिनिधी Yaval

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लोक प्रभावित झालेले आहेत.बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे,सदर प्रश्न गंभीर असून ऑक्सीजन सॅच्युरेशन कमी झालेल्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी समतोल राखण्यासाठी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते अशा परिस्थितीत ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर लागत असतात, ही गरज लक्षात घेऊन यावल तालुक्यात जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथील कोविड सेंटरकरिता ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवण्यासाठी रकमेची आवश्यकता होती.

त्यासाठी प्रांताधिकारी कैलास कडलग,तहसिलदार महेश पवार,गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी तालुक्यातील सर्व जि.प. तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांना स्वेच्छेने देणगी स्वरूपात रक्कम द्यावी यासाठी आवाहन केले होते.

सदर आवाहनाला खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत केवळ तीनच दिवसात सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी एकूण चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये (४०५८१५ रु.) जमा करुन फैजपूर कोविड सेंटरमध्ये ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवणे कामी मदत केली.एवढी मोठी रक्कम मदत करण्याचे कार्य जिल्ह्यातून प्रथमच यावल तालुक्यातील शिक्षकांनी केलेले आहे.सदर रक्कम ही तहसिलदार महेश पवार यांचेकडे सुपूर्त करण्यात आली.सदर प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,गटशिक्षणाधिकारी नईम शेख,गटसमन्वयक प्रमोद कोळी,योगेश इंगळे ,इम्तियाज फारुकी आणि कुंदन वायकोळे हे उपस्थित होते.तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांनी मदतीसाठीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठा निधी जमा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

शिक्षक हा समाजाचा कणा असतो आणि समाजास सहकार्य करतांना नेहमी पुढे असतो हे यावल तालुक्यातील सर्व जिप प्राथ माध्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या त्यांच्या उपक्रमातून सिद्ध करून दाखवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com