जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

एरंडोल तालुक्यातील कढोली येथे भास्कर झावरु बडगुजर यांचा मुलगा सुनील बडगुजर याचे 17 रोजी लग्न लागल्यानंतर वर्हाडी मंडळीसह गावातील नागरिक पंगतीत जेवण केले. काही वेळातच 100 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली. काहींना उलट्या व जुलाब होत असल्याने घटनास्थळी रिंगणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तात्काळ दाखल झाले असून बाधितांवर उपचार सुरु आहे.

कढोली गावाची लोकसंख्या तीन ते साडेतीन हजार असून गावात भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाचे आज लग्न होते. लग्न लागल्यानंतर वर्हाडी मंडळींसह नागरिकांनी दुपारी 2 ते 3 वाजेनंतर पंगतीमध्ये जेवनाचा अस्वाद घेतला. यावेळी अन्नातून 100 जणांना विषबाधा झाल्याने काही वेळात नागरिकांना उलट्या व जुलाब होत असल्याची लक्षणे दिसून आली.

जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांना या घटनेची माहिती नागरिकांनी दिली. त्यांनी रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भंगाळे यांचेशी संपर्क साधून ते स्वत: पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने बाधित रुग्णांची तपासणी केली असून बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास 5 गंभीर बाधित रुग्णांना जळगावकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे.

गावातील नागरिकांची तपासणी

लग्नात ज्या नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली. त्यात 70 रुग्णांची रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भंगाळे यांच्या पथकाने उपचार केले असून 80 नागरिकांची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. वैद्यकीय पथक गावात तळ ठोकून होते.