ध्वजारोहणाचा मान : ७८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक फडकाविणार झेंडा

थेट जनतेतून निवड नसल्याने गावकारभार्‍यांची यंदा हुकली संधी
ध्वजारोहणाचा मान : ७८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक फडकाविणार झेंडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन 18 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.

मात्र, सरपंच पदासाठी 26 जानेवारीपूर्वी आरक्षण सोडत निघाली नसल्याने यावर्षी सरपंचांऐवजी जिल्ह्यातील 783 ग्रा.पं.वर प्रशासकच झेंडा फडकाविणार आहे. आरक्षण निवडीअभावी यावर्षी ध्वजारोहणाच्या मानाची संधी नवनिर्वाचित सरपंचांची हुकली आहे.

दरवर्षी ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय सणउत्सव प्रसंगी ध्वजारोहणाचा मान लोकनियुक्त सरपंचांना असतो. परंतु गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल सात ते आठ महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्यामुळे ग्रामस्तरावर विकासकामे रखडू नयेत म्हणून गेल्यावर्षी जुलै महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्यापही हे प्रशासक ग्रामपंचायतींवर कायम आहेत.

डिसेंबर अखेर या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होवून 18 जानेवारी 2021 रोजी निकाल जाहीर झाले. मात्र, थेट जनतेतून सरपंच निवड न झाल्याने नवनियुक्त सरपंचांच्या हस्ते झेंडावदनाची संधी हुकणार आहे. यावर्षी ध्वजारोहणाचा सन्मान सरपंच ऐवजी प्रशासकाला मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यात 1153 ग्रामपंचायती असून त्यापैकी 783 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेली आहे. 28 व 29 जानेवारी रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे.

या पंचवार्षिक दरम्यान, शासन निर्णयानुसार लोकनियुक्त सरपंचपद नसल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार याविषयी उत्सुकता आहे. निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड झालेली नाही.

येत्या 28 जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण सोडतीनंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सरपंचाची निवड होणार आहे. या सर्व प्रक्रिया प्रजासत्ताक दिनानंतरच पार पाडली जाणार आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com