जळगाव : चोरट्यांकडून पाच मोटारसायकली जप्त
जळगाव

जळगाव : चोरट्यांकडून पाच मोटारसायकली जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

कामधंदा काहीही न करता पैशांची उधळपट्टी करुन मित्रांसोबत दारुच्या पार्ट्या उडवणार्‍या किनगाव (ता.यावल) येथील तरुणावर पोलिसांनी करडी नजर ठेवून त्यास अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने मोटारसायकली चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यासह चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

किनगाव येथील सागर सुपडू कोळी याच्या विरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. सध्या तो कामधंदा करीत नाही. पण, तो पैशांची उधळपट्टी करीत असून मित्रांसोबत दारुच्या पार्ट्या उडवत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार या पथकाने किनगावात जावून सापळा रचला आणि त्यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता सागर कोळी याने यावल तालुक्यातील नायगाव, आडगाव, डोणगाव, चुंचाळे येथून अनुक्रमे बजाज डिस्कव्हर, होंडा शाइन, बजाज प्लॅटीना, बजाज डिस्कव्हर, हिरो होंडा सीडी डिलक्स अशा गाडया प्राथमिक तपासात काढून दिल्या. तो या मोटारसायकली जळगाव शहरातील अट्टल आरोपी आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे याच्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी देत होता. या मोटारसायकली ज्यांनी घेतल्या त्यांना सुद्धा पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

यांना झाली अटक

मोटारसायकल चोरी करणारे आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय २२, रा.रथ चौक, कोळीपेठ, जळगाव), सागर सुपडू कोळी (वय २४, किनगाव, ता.यावल) यांच्याकडून चोरीच्या मोटारसायकल घेणारे सुदर्शन शांताराम मोरे (वय २४, तलाठी कार्यालयाजवळ, मेहरुण, जळगाव), दीपक बाबुलाल खांदे (वय २६, अयोध्यानगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून मोटारसायकल चोरीचे आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत.

यांनी केली कारवाई

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहोम यांना पथके स्थापन करण्यासाठी सूचना दिली होती. त्यानुसार निरीक्षक रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरीगोसावी, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने ही कामगिरी केली.

Deshdoot
www.deshdoot.com