जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाई कुर्‍हाड

जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाई कुर्‍हाड

शासकीय दप्तर बेकायदा ताब्यात ठेवल्याप्रकरणी पाच ग्रामसेवक कारागृहात ; जिल्हाधिकार्‍यांची ऐतिहासिक कारवाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आठ ग्रामसेवकांवर बुधवारी कारवाईची कुर्‍हाड कोसळली आहे.

पदभार सोडल्यानंतरही सरकारी दस्तऐवज (दफ्तर ) बेकायदा ताब्यात ठेवल्याचे प्रकरण चांगलेच भोवले असून ग्रामसेवकांना 30 दिवस दिवाणी बंदीवासात कारागृहात ठेवण्यासह 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

आठ पैकी पाच ग्रामसेवकांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली असून इतर दोन जण आज सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांना दिसतील त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

यातील एक ग्रामसेवक आजारी असल्याने त्यास 4 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ ग्रामसेवकांवर एकाचवेळी कारवाई झाल्याचा महाराष्ट्रातील पहिलाच खटला असल्याचे बोलले जात आहे.

अनेकदा सूचना देवूनही दप्तर देण्यास विलंब

याबाबत विधी अधिकारी अ‍ॅड. हरूल देवरे यांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 179 नुसार अर्जदार यांनी 27 फेब्रुवारी 2020 रोजी वरील 8 ग्रामसेवकांविरुद्ध कार्यालयात विवाद अर्ज सादर केला आहे.

विवाद अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. याबाबत सखोल चौकशी करून ग्रामपंचायत विवाद अर्ज देण्यात आले.

अनेकदा सुचना देऊनही ग्रामसेवकांनी शासकीय दप्तर मागणी करूनही दिले नाही. त्यामुळे आज सुनावणीच्या अंतीम दिवशी जिल्हाधिकारी राऊत यांनी सर्व ग्रामसेवकांना दिवाणी बंदीवासात ठेवण्याचा निर्णय दिला.

हा निर्णय दिल्यानंतर तात्काळ आठ पैकी पाच ग्रामसेवकांना जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास शेंडे, पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले.

या ग्रामसेवकांना घेतले ताब्यात

यात राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सिम बोदवड जि.जळगाव), सुभाष रामलाल कुंभरे, ग्रामसेवक (धौडखेडा ता. बोदवड जि . जळगाव), सुरेश दत्तात्रय राजहंस ग्रामसेवक ग्रामपंचायत (वरखेड ता. बोदवड जि . जळगाव), गणेश रामसिंग चव्हाण ग्रामसेवक ग्रामपंचायत (जुनोने दिगर ता. बोदवड जि . जळगाव ), नंदलाल किसन येशीराया ग्रामसेवक (ग्रामपंचायत लोंजे ता. चाळीसगाव जि . जळगाव) या पाच जणांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 179 (2) अन्वये ताब्यात घेऊन त्यांची दिवाणी बंदीवासात रवानगी करण्यात आली आहे. तसेच 30 दिवसात त्यांना शासकीय दप्तर जमा करण्याचे आदेश देण्यात आले असुन 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

प्रकृती बरी नसल्याने एका ग्रामसेवकास मुदत

वडजी ता, बोदवड येथील डी. एस. इंगळे या ग्रामसेवकांची प्रकृती बरी नसल्याने त्यांचे दप्तर ताब्यात घेऊन उर्वरीत कागदपत्र जमा करण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही कागदपत्र न जमा केल्यास इंगळे याला देखिल ताब्यात घेतले जाणार आहे.

गैरहजर दोघांना दिसताच क्षणी दोघांना ताब्यात घ्या

या खटल्यात सुनावणीला विनायक चुडामण पाटील (ग्रामसेवक, झुरखेडा ता. धरणगाव), अनिल कचरू जावळे (ग्रामसेवक दोनगाव ता. धरणगाव) हे दोन्ही गैरहजर राहिले.

त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे दोन्ही ग्रामसेवक दिसतील त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे.

30 दिवसात दप्तर न दिल्यास फौजदारी गुन्हा

संपूर्ण शासकीय दप्तर आणून दिल्यास जिल्हाधिकारी कार्यातील अधिकार्‍यांकडून दप्तरची तपासणी करण्यात येवून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ग्रामसेवकांची तत्काळ सुटका होणार आहे.

जर 30 दिवसाच्या दिवाणी बंदीवासातही संबंधित ग्रामसेवकांनी शासकीय दप्तर जमा केले नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती विधी तज्ञ अ‍ॅड हरुल देवरे यांनी दिली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com