एकाच कुटंबातील पाच आरोपींना जन्मठेप

एकाच कुटंबातील पाच आरोपींना जन्मठेप

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील राजीव गांधीनगर भागातील एका तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना

12 जुलै 2017 रोजी घडली होती. या खटल्यात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने एकाच कुटुंबातील पाच जणांना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

जळगाव शहरातील रहिवाशी राहुल सकट याचा दि. 12 जुलै 2017 रोजी पगार झालेला होता. त्यामुळे घरासमोर असलेल्या टेकडीजवळील परिसरात जेवणासाठी गेलेला होता.

त्यावेळी सत्यासिंग मायासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, राहुलने पैसे दिले नाहीत, म्हणून दोघांमध्ये शिवीगाळ होऊन वाद झाला होता.

त्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी असे घरासमोर आले व त्यांनी शिवीगाळ करीत राहुल सकटला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेला माळसाबाईने विरोध केला असता सत्यासिंग व रवीसिंगने तिला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे माळसाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यानंतर सत्यासिंगने धारदार शस्त्राने राहुल सकट याच्या पोटात चाकू खुपसून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी अजय प्रल्हाद सकट याच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम 143,147,148,149,323,307,504 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान दुसरीकडे राहुल सकट यांची प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले होते. मात्र, नाशिकजवळच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नाशिक येथेच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर या पाच आरोपींवर 302 हे अतिरिक्त कलम वाढविण्यात आले होते. जळगाव न्यायालयात ऑक्टोबर 2017 मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर 2017 पासून या खटल्यास सुरुवात झाली.

या खटल्यात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात मनोज नाणे, अरविंद पाटील, अजय सकट, योगेश जाधव, प्रत्यक्षदर्शी रमेश झेंडे, प्रवीण सोनवणे, म्हाळसाबाई सकट, चंद्रकांत हतांगडे, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रवीण पाटील, पो.कॉ. सुरेश मेढे, पीएसआय राजेश घोळवे, पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, डॉ.निखिल सैंदाणे यांचा समावेश होता.

या खटल्यात अंतीम युक्तीवादानंतर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जे. कट्यारे यांनी या खटल्यात पाचही आरोपींना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना जन्मठेपेसह एक हजार रुपयाचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अतिरिक्त भोगावी लागणार आहे.

विशेष म्हणजे पाचही आरोपी लावलेल्या प्रत्येक कलमात दोषी आढळलेले आहे. या प्रकरणी सरकार पक्षाकडून अ‍ॅड.केतन ढाके यांनी तर आरोपींकडून अ‍ॅड.हेमंत सूर्यवंशी,अ‍ॅड.केदार भुसारी,अ‍ॅड. प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com